दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेश खाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश पहिल्या टप्प्यात झालेला असला तरी खातेवाटपात सामाजिक न्याय खाते अपेक्षित असताना  कामगार खाते मिळाल्याने ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था झाली आहे. मात्र, मिळालेली जबाबदारी मोलाची असल्याचे सांगत आपण या विभागातही समाधानी असल्याचे मंत्री खाडे यांनी सांगितले. मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आ. सुधीर गाडगीळ यांच्या नावाचा आग्रह असताना पुन्हा पक्षाने जातीय व प्रादेशिक समतोल राखण्यासाठी खाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला असला तरी  दुय्यम खाते देऊन दुसरीकडे संघाचीही खप्पा मर्जी होणार नाही याची दक्षता घेतल्याचे जाणवते.

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये आणि तेही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा कमळ फुलविणारे म्हणून पक्षात खाडे यांचे जेष्ठत्व अबाधित आहे. सलग  चार वेळा त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केल्याने मंत्रीपदावरही त्यांचा हक्क आहेच, मात्र, तिसर्‍यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केलेल्या आ. गाडगीळ यांची मंत्रिमंडळात किमान राज्यमंत्री म्हणून वर्णी लागावी, जेणेकरून संघातील लोकांनाही सत्तेत सहभागी करून घेतले जाते, हा संदेश जावा अशी अपेक्षा संघाकडून होती. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ खाडे यांना संधी दिली गेली. २०१९ मध्ये झालेल्या  विधानसभा निवडणुकीमध्ये खाडे यांच्या विजयी मिरवणुकीत मोटारीवर भावी पालकमंत्री म्हणून फलक लावण्यात आला होता. यामुळे खाडे यांची पालकमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नव्हती. मात्र, सुरुवातीच्या काळात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील व नंतर  सोलापूरचे सुभाष देशमुख हे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. खाडे यांची पालकमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झालीच नाही. अखेरच्या टप्प्यात केवळ तीन महिन्यासाठी समाजकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली त्यातील दोन महिने आचारसंहितेत गेले. यामुळे उठावदार कामच करताच आले नाही याची खंत त्यांना आहे.  

खाडे यांच्यामुळेच भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पाय रोवण्यास आणि विस्तार करण्यास वाव मिळाला. यामुळे खाडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश  क्रमप्राप्त होता असा दावाही आता संघाकडून केला  जात आहे. मात्र खातेवाटपामध्ये कामगार खाते मिळाल्याने खाडे समर्थकांमध्ये नाराजीही आहे. ही नाराजी धड बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही अशी समर्थकांची अवस्था झाली आहे. मंत्री खाडे मात्र, पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मिळाल्याने समाधानी आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh khade is labour minister in eknath shindes cabinet print politics news pkd
First published on: 15-08-2022 at 15:13 IST