Sushma Andhare vs Sheetal Mhatre Controversy : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या एका विधानामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला पाण्याची जोडणी दिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये केलेल्या आरोप प्रत्यारोपांची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके आहे तरी काय? सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यात कशामुळे जुंपली? त्याविषयीचा हा आढावा…

शीतल म्हात्रे यांचे आरोप काय?

अशोक खरात प्रकरणावरून शीतल म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केले. “क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही ‘ताज’ का राज? ठाकरे गटाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचे पाणी पळेल, अशी पोस्ट म्हात्रे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? खासदार-आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या… मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, असा टोला म्हात्रे यांनी लगावला. प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला, आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा? त्यातच आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात संजय राऊत यांची कॉलर धरली म्हणे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा : संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार? शिंदेंच्या चार शिलेदारांचे पद धोक्यात? वाचा ५ घडामोडी…

सुषमा अंधारे यांनी कसे दिले प्रत्युत्तर

शीतल म्हात्रे यांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा ‘Self Goal’ केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते. विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे…. म्हात्रे काय गोरे काय… यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत… दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

‘तो’ व्हिडीओ कोणी व्हायरल केला? अंधारेंचा सवाल

राजकारण आणि युद्धामध्ये नीतिशास्त्र असते आणि एकमेकांच्या कुटुंबीयांवर हल्ले करायचे नसतात. आजपर्यंत आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर बोललो; पण लता वाहिनी यांच्यावर कधीच टीका केली नाही. शिवाय श्रीकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांनादेखील आम्ही लक्ष्य केले नाही. मात्र, कोणी जर ठाकरे कुटुंबियांवर बोलत असेल तर नाईलाजाने आम्हाला त्यांची जागा दाखवून द्यावी लागते, अशी टीकाही अंधारे यांनी केली. शीतल म्हात्रे यांनी या सर्वांवर बोलण्यापेक्षा रॅलीतील त्यांचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? हे त्यांनी सांगावे. राज सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून हा ओरिजिनल व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र, शीतल म्हात्रे म्हणाल्या की माझा व्हिडीओ फेक आहे. मग त्यांनी ओरिजिनिल व्हिडिओ दाखवा. राज सुर्वे कोण आहे हेही सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मला बोलायला भाग पाडू नका. म्हात्रे बाईंनी मला फुलटॉस देऊच नये. मी विकेट काढेन, असा थेट इशाराही अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला.

हेही वाचा : Ajit Pawar Case : झिरो एफआयआर कसा नोंदवला जातो? रोहित पवारांनी कर्नाटक पोलिसांत का नोंदवली तक्रार? कारण काय?

अशोक खरातच्या पाण्याचे प्रकरण काय?

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना ३१ जुलै २०२० रोजी जलसंपदा विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील अशोक खरात याच्या शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी आरक्षित करून देण्यात आले होते. हे पाणी दारणा धरण आणि गोदावरी उजवा तट कालव्याच्या ४८ व्या किलोमीटरवरून उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. राज्यात करोना महामारीचे संकट असताना त्यावेळच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अशोक खरातच्या संस्थेला वळवले होते, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. हा निर्णय मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर घेण्यात आल्याची टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. यादरम्यान अशोक खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या या वादाची संपूर्ण राज्यभरात चर्चा होत आहे.