scorecardresearch

Swami prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्यंचं शीर धडावेगळं करणाऱ्यास तब्बल २१ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा!

अयोध्येतील हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी ही घोषणा केली आहे.

Swamiprasad Mourya
( संग्रहित छायाचित्र-स्वामीप्रसाद मौर्य)

अयोध्येतील हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सोमवारी समजावादी पार्टीचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे शीर धडापासून वेगळे करणाऱ्यास तब्बल २१ लाख रुपेयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मौर्या यांनी रामचरितमानस बद्दल टिप्पणी केली होती.

राजू दास यांनी म्हटले आहे की, भारतीय ओबीसी महासभेद्वारे रविवारी लखनऊमध्ये ज्याप्रकारे रामचरितमानसच्या प्रती जाळण्यात आल्या, हे स्वामी प्रसाद मौर्य यांचं काम आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी काय म्हटलं होतं? –

स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे की धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आलं आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे. रामचरितमानसमध्ये एक चौपाई लिहिली आहे, त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल, तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे. असंही मौर्य यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच आणखी एका सपा नेत्याने रामचरितमानस विरोधी वक्तव्य केलं आहे. या ग्रंथावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्वाचल, अवध या प्रदेशातील मौर्य, शाक्य, सैनी आणि कुशवाहा या बिगरयादव मागासवर्गीय समाजामध्ये (ओबीसी) स्वामी प्रसाद मौर्याचे राजकीय वजन असून ते मागास-अतिमागास जातिसमूहांचे नेते मानले जातात. सुमारे १३ जिल्ह्यांमध्ये या जातींचा प्रभाव असून हे मतदार तिथल्या मतदारसंघांमध्ये निकाल फिरवू शकतात.

मौर्य हे मागील भाजपा सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. फाजिलनगर जिल्ह्यातील कुशीनगर मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले. नंतर समाजवादी पार्टीने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:21 IST