नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. नागपुरात भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याने पुन्हा भाजप-मनसे युतीच्या चर्चेला तोंड फुटले. अपेक्षेप्रमाणे ठाकरे यांनी यासंदर्भातील संभ्रम कायम ठेवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यात जाहीर सभा किंवा तत्सम कार्यक्रमांचा समावेश नव्हता. नागपूर, चंद्रपूर अमरावती येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सध्या मृतावस्थेत असलेल्या पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षानंतर ठाकरे या भागात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, पक्षबांधणीसाठी काही कार्यक्रम देतात काय? या भागातील प्रश्नांवर ते काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. पक्ष स्थापनेला १६ वर्षे होऊनही नागपुरात पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही, याची स्पष्ट कबुली ठाकरे यांनी दिली. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, असा कानमंत्र त्यांनी अमरावतीत दिला. केवळ पदे घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना यापुढे मनसेत स्थान असणार नाही. जो पक्षासाठी काम करेल, तोच पदावर राहील, असा इशाराही दिला.

हेही वाचा… मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीच्या चळवळीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उडी घेतल्याने सध्या हा मुद्दा विदर्भात ऐरणीवर आहे. या मुद्यावर राज यांची भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. विदर्भ राज्यासाठी जनमत चाचणी घ्या, असे सांगून ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठ चोळले. ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच वेगळ्या विदर्भ राज्याला विरोध आहे. तो त्यांनी यापूर्वीर्ही स्पष्टपणे बोलून दाखवला. यावेळी त्यांनी जनमत चाचणीचा मुद्दा पुढे केला. यापूर्वी एका सामाजिक संघटनेने केलेल्या चाचणीत विदर्भातील लोकांचा कौल वेगळ्या राज्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा हीच मागणी करून ठाकरे यांनी काय साध्य केले, अशी टीका आता त्यांच्यावर विदर्भवादी करीत आहेत.

हेही वाचा… दसरा मेळाव्यातील शक्ती प्रदर्शनाची जबाबदारी बंडखोरांच्या शिरावर

विदर्भात विधानसभेचे ६२ मतदारसंघ आहेत. चार महापालिका आहेत. पक्ष स्थापन होऊन अनेक वर्षे होऊनही मनसेला विदर्भात आपले पाय रोवता आले नाही. केवळ राज ठाकरे यांच्या दौऱ्यात कार्यकर्ते गर्दी करतात. इतर वेळी या पक्षाला गर्दी जमवावी लागते. नागपूर सारख्या मोठ्या महापालिकेत पक्षाचा एक सदस्य नाही यावरून या शहरातील या पक्षाची स्थिती स्पष्ट होते. अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापुरताच हा पक्ष नागपुरात आणि विदर्भात सुद्धा अस्तित्व ठेवून आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना या भागात पक्ष वाढवायचा असेल या भागाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. ही बाब ठाकरे ठाकरे यांना उशिरा का होईना लक्षात आली व ते त्यांनी जाहीरपणे मान्य देखील केेली. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतानाही काळजी घ्यावी लागेल. गाले. मनसे कार्यकर्त्यांनी फसवणूक केल्याने संतापलेल्या महिलांनी चंद्रपूरमध्ये ठाकरे यांच्या हॉटेलपुढे निदर्शने करून संताप व्यक्त केला.

हेही वाचा… ‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”

शिवसेनेतील नाराज कार्यकर्त्यांना पूर्वी मनसे हा एक पर्याय होता. आता शिंदे गटाच्या निमित्ताने त्यांना दुसरा पर्यय मिळाला. त्यामुळे मनसेला नवीन कार्यकर्ते जोडावे लागतील, त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. त्या अनुषंगाने ठाकरे यांच्या दौऱ्यात काही दिसून आले नाही. ठाकरे यांनी भाजप नेेत्यांच्या घेतलेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली. गडकरींनी त्यांना नागपुरातील जगप्रसिद्ध फाऊंटन शो दाखवला. या कार्यक्रमात गडकरी यांच्या कामाची राज यांनी मुक्तकंठाने प्रशांसा केली. त्यामुळेच मनसे भाजपच्या जवळ जात असल्याचे चित्र या दौऱ्याच्या निमित्ताने दिसून आले. युतीबाबत मी माध्यमांतूनच एकतो, असे सांगून ठाकरे यांनी याबाबत अद्याप काहीच ठरले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच मोठ होता येतं. त्यामुळे नागपुरात भाजप मोठा पक्ष असेल तर त्यांच्या विरोधातही लढावे लागेल, असे सांगून भाजपलाही इशारा दिला.

एकूणच राज ठाकरे यांचा दौरा पक्षबांधणीसाठी होता असे मनसेकडून सांगण्यात येत असले तरी या पातळीवर किती यश या पक्षाला मिळते हे पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

राज यांच्या दौऱ्यामुळे पक्ष बळकट होईल राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा पक्ष बांधणीसाठी होता. त्यांनी थेट पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्या स्थिती जाणून घेतली. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात नवा उत्साह निर्माण होईल.जेथे मरगळ आल्याचे निदर्शनास आले तेथे पुढच्या काळात बदल केले जाणार आहे. पक्ष फक्त फोटो काढण्यासाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी आहे, काम करणाऱ्यांनाच पक्षात संधी आहे हे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. याचा पक्षाला फायदाच होईल – विठ्ठल लोखंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take public opinion on independent vidarbha state said by raj thackeray print politics news asj
First published on: 22-09-2022 at 11:14 IST