अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू या मोठ्या राज्याची सत्ता हस्तगत केली. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, आसाम, गोवा अशा विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना स्वबळावर सत्ता मिळाली. पण त्याच वेळी महाराष्ट्रात जनाधार असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षांना राज्यातील मतदारांनी कधीच एकहाती सत्ता दिलेली नाही. राज्यात प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा तेवढा प्रभावी ठरलेला दिसत नाही. 

फेब्रुवारी २०२४ मध्ये अभिनेता जोसेफ विजय यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तमिळनाडूत १९६७ पासून द्रमुक अथवा अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांची सत्ता होती. पहिल्यांदाच राज्यात बदल झाला असला तरी टीव्हीके या प्रादेशिक पक्षालाच सत्ता मिळाली. तमिळनाडूत प्रादेशिक अस्मिता प्रखर असल्याने गेल्या सहा दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना तेवढा जनाधार मिळू शकलेला नाही. विजय यांनी लोकप्रियतेवर स्वार होत एकहाती यश संपादन केले. विजय यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. 

आंध्र प्रदेशात तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांची सत्ता आहे. याआधी जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस हा पक्ष सत्तेत होता. १९८०च्या दशकापासून एन. टी. रामाराव यांनी तेलुगू अस्मितेच्या आधारावर स्थापन केलेल्या पक्षाने राजकीय संदर्भ बदलले. २००४ व २००९ मध्ये राजशेखर रेड्डी यांच्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळाली. हा अपवाद वगळता प्रादेशिक पक्षांचा पगडा राहिला आहे. तेंलगणा राज्याच्या निर्मितीनंतर के. चंद्रशेखर राव यांच्या प्रादेशिक पक्षाची सत्ता होती. आता काँग्रेस सत्तेत आहे. पंजाबमध्ये अकाली दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, हरियाणात चौधरी देवीलाल व चौटाला यांच्या पक्षाची सत्ता होती. 

महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांना स्थान नाही

राज्यात शिवसेनेची मराठी अस्मितेच्या मुद्दयावर स्थापना झाली. शिवसेनेने आधी दाक्षिणात्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तेव्हा मुंबई, ठाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चांगला प्रतिसाद मिळाला. १९८५ मध्ये शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली. शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली १९९५ मध्ये पण ती भाजपबरोबर युतीत. शिवसेनेला स्वबळावर राज्यात कधीच यश मिळाले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यात चांगला जनाधार होता. पण त्यांनाही कधी राज्याची एकहाती सत्ता आणता आली नाही. शरद पवारांची ६० आमदार निवडून आणण्याची तेव्हा ताकद होती. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना पवारांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी वातावरण तापविले. २००९च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी हवा तापविली होती. परंतु त्यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर हे यश राज ठाकरे यांना टिकविता आले नाही.

गर्दी आणि यशाचे गणित

तमिळनाडूत विजय यांच्या सभा किंना रोड शोला प्रचंड गर्दी होत असे. करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. गर्दी जमली तरी ती मतांमध्ये रुपांतरित होईल का, असा प्रश्न विचारला जात होता. गर्दी जमणाऱ्या विजय यांना पहिल्याच फटक्यात यश मिळाले. आंध्र प्रदेशात २००९च्या निवडणुकीपूर्वी सुपरस्टार चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षाने अशीच हवा तयार केली होती. चिंरजीवी यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. पण विधानसभेत चिंरजीवी यांच्या पक्षाचे १८ आमदार निवडून आले. चिंरजीवी यांच्या बंधू पवन कल्याण हे सुद्धा चित्रपट अभिनेते. ते सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जनासेना पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. आंध्रमध्ये कापू हा मोठा समाज आहे. कापू समाजाच्या पाठिंब्यावर पवन कल्याण यांना यश मिळाले. राज ठाकरे यांच्या सभांना राज्यात अजूनही मोठी गर्दी होती. पण मतांमध्ये रुपांतरीकत करण्यात राज ठाकरे यांना यश आलेले नाही.

राज्यात यश का नाही ?

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे पट्ट्यात प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा प्रभावी ठरला. विदर्भात कधीच प्रादेशिक पक्षांना यश मिळाले नाही. यामुळे ६० पेक्षा विधानसभेच्या अधिका जागा असलेल्या विदर्भात प्रादेशिक पक्षांना मोठ्या प्रमाणावर जागा जिंकत्या आल्या नाहीत. सहकार चळवळीची पाळेमुळे असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट होती. मराठवाज्यात जातीय समीकरणे असली तरी प्रादेशिक पक्षांना कधी स्थान मिळाले नाही. उत्तर महाराष्ट्कातही तेवढे यश मिळाले नाही.