Tamil Nadu Election Result 2026 DMK vs TVK Party Wise Result : सगळ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्राथामिक कलांनुसार, पश्चिम बंगाल व आसाममध्ये भाजपा, केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी आणि तमिळनाडूत अभिनेता विजय याचा ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून आले. जेमतेम दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विजय याचा पक्षाने राज्यात मोठी मुसंडी मारल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अण्णाद्रमुक दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर आघाडीवर आहे, तर सध्या राज्याच्या सत्तेत असलेला द्रमुक पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

तमिळनाडूत कोण किती जागांवर आघाडीवर?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये सर्वात धक्कादायक कल हे तमिळनाडूमधून समोर आले आहेत. येथे सत्ताधारी द्रमुक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने सायंकाळी सात वाजेपर्यंत जारी केलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २३४ जागांपैकी तब्बल १०९ जागांवर अभिनेता विजय याच्या पक्षाने आघाडी मिळवली आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकला ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी केवळ ५२ जागांवरच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

तमिळनाडूत बहुमताचा आकडा किती?

गेल्या अनेक वर्षांपासून तमिळनाडूचे राजकारण हे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आले आहे. २३४ जागा असलेल्या तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. मात्र, सध्याचे कल पाहता राज्यात तिरंगी लढत दिसत असून, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकप्रणित आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून राज्यात १० वर्षांनंतर सत्ता स्थापन केली होती, तर त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकला केवळ ६६ जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीनंतर एम. के. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यावेळी मात्र अभिनेता विजय ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर तिसरा पर्याय ठेवला होता. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत विजयच्या पक्षाला राज्यातील मतदारांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याचेच प्रतिबिंब यावेळच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून आले.

राज्यात ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाची लाट

२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाची स्थापना केल्यानंतर अभिनेता विजयने विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली होती. या सभेला सुमारे तीन लाख लोक जमले होते. पहिल्याच सभेत विजयने आपली राजकीय विचारधारा, आपण कोणाविरोधात लढणार आहोत, हे स्पष्ट केले होते. भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका करताना आपला पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा असेल, हे त्याने स्पष्ट केले. द्रविडम आणि राष्ट्रवाद हे आपल्या विचारधारेचे दोन महत्त्वाचे पैलू असल्याचेही विजयने या सभेत सांगितले होते. तसेच तमिळनाडूचे महापुरुष पेरीयार यांचा देव-देवतांच्या विरोधातला विचार सोडून इतर द्रविडम विचारसरणी स्वीकारत असल्याचेही विजयने जाहीर केले होते.

द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या वर्चस्वाला धक्का?

स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९६७ या काळात तमिळनाडूत काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते के. कामराज यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. त्यानंतर १९६७ च्या निवडणुकीत राज्यात सी. एन. अन्नादुराई यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. १० वर्षांनी एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी द्रमुकमधून बाहेर पडून अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून राज्यात या दोनच पक्षाची आलटून पालटून सत्ता येत आहे. १९६७ ते २०२१ पर्यंत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख पक्षांनी राज्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळवले आहे. या काळात एमजीआर, एम. करुणानिधी, जे. जयललिता, ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. के. स्टॅलिन या नेत्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. यादरम्यान, यंदाच्या त्रिशंकू विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूत कोणाचे सरकार येणार, हे मतमोजणीच्या अंतिम कलानंतरच स्पष्ट होणार आहे.