तामिळनाडूच्या राजकारणात एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. जनमताचा आदर करत असल्याचे सर्वच पक्ष सांगत आहेत. तर दुसरीकडे तेच पक्ष सत्ता स्थापनेसाठी इतर मार्गांचा पर्याय शोधत आहेत. तामिळनाडूच्या राजकारणात मागील दशकभराच्या कालावधीत पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अभिनेता विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरला. जनतेने द्रमुकला सत्तेतून बाहेर काढले, तर विरोधक असलेल्या अण्णाद्रमुकलाही नाकारले. तमिळनाडूतील जनतेला एक नवीन पर्याय हवा आहे, असा संदेश निवडणूक निकालातून मिळतो. तो नवीन पर्याय तामिळनाडूच्या जनतेला अजमावून पाहायचा आहे, असा संदेश मिळतो. सत्ता स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. विजय यांच्याकडे सध्या लागणारे ११८ जागांचे बहुमत नाही. त्यामुळे तमिळनाडूत पेच फसला आहे. निवडणुकीपूर्वी जे पक्ष विजय यांना गांभीर्याने घेत नव्हते, ते पक्ष आता विजय यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
तामिळनाडू सत्ता स्थापनेसंदर्भात आलेली ही आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यात राजकीय पक्ष गुंतले आहेत. विचारधारा सध्या दुय्यम झाली आहे. राज्यपाल केंद्रस्थानी आले आहेत. व्हॉट्सअॅप व सिग्नल या अॅप्सवरून मेसेजेस एकमेकांना पाठवले जात आहेत. इतकी वर्ष एकमेकांविरोधात लढलेले पक्ष बिल्डर लॉबीच्या माध्यमातून मागच्या दाराने एकमेकांशी संवाद साधत आहेत. राजकीय शत्रू म्हणवले जाणारे पक्ष एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा बोलत आहेत. छोट्या मित्रपक्षांचा एकमेकांवरून विश्वास उडाला आहे. प्रत्येक जण आकड्यांची जुळवाजुळव, मोजणी करण्यात व्यस्त आहे, असे चित्र सध्या चेन्नईत आहे.
विजय यांना राजकारणाचा अनुभव नसल्याने ही परिस्थिती? की आणखी दुसरे कारण?
राजकारणात जोसेफ विजय हे नवीन आहे, त्यांना राजकारणाचा अनुभव नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली नाही. तर यामागे द्रमुक व अण्णाद्रमुक या पक्षांना विजय यांच्यामुळे वाटणारे भय देखील कारणीभूत आहे. फक्त पाच वर्ष सत्तेच्या बाहेर राहावे लागेल, ही या दोन पक्षांची भीती नाही. तर तामिळनाडूच्या एका इतिहासाबाबत या दोन पक्षांच्या नेत्यांना भीती वाटत आहे. एम.जी.रामचंद्रन हे देखील सिनेसृष्टीतून तामिळनाडूच्या राजकारणात आले होते. त्यानंतर रामचंद्रन यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने राजकारणात भक्कम पाय रोवले. त्यांच्यानंतर सिनेसृष्टीतून आलेल्याच जे. जयललिता यांनी अण्णाद्रमुकला आणखी पुढे नेले. रामचंद्रन हे फक्त ‘अभिनेते’ आहेत, अशी टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. परंतु, नंतर काय घडले हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे विजय यांचा उदय म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरूवात तर ठरणार नाही? याबाबत द्रमुक व अण्णाद्रमुकच्या नेत्यांना भीती आहे. विजय यांची सत्ता पुढील काही दशके कायम राहिली तर आपले अस्तित्व काय असेल, याची भीती द्रमुक व अण्णाद्रमुकच्या नेत्यांना आहे.
कॅसिनो पॉलिटिक्स सुरू?
द्रमुकच्या एका नेत्याने तमिळनाडूत सध्या ‘कॅसिनो पॉलिटिक्स’ सुरू असल्याचे म्हटले. सध्या काही लोक सत्ता स्थापनेचा जुगार खेळत आहेत. ओढून-ताणून या खेळासाठी बाकी सर्वांना आणलं जात आहेत, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. लाखो लोकांनी मत देऊन निवडून आणल्यानंतर ११८ या आकड्याची काय गरज आहे, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेपासून का अडवले जावे, असा सवाल विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे कार्यकर्ते विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर हे ‘घटनात्मक स्थिरता’ आहे. विधानसभा या भावनेवर चालत नसून त्या संख्याबळावर चालतात. दरम्यान, दोन्ही युक्तीवाद राजकीयदृष्ट्या आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. त्यामुळे तमिळनाडूत सध्या गोंधळाचे वातावरण आहे.
तमिळनाडूत राजकीय लोचा?
विजय यांना जनमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा द्रमुक व अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. परंतु, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. असंतोष, भय आणि आकड्यांची जुळवाजुळव पडद्यामागे सुरू आहे. काँग्रेसने टीव्हीकेला समर्थन दिल्यानंतर तर विजय यांच्यासाठी परिस्थिती आणखी बिघडली. टीव्हीकेबरोबर सत्तेत जाणाऱ्या काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत जाऊ द्यायचे नाही, असा पवित्रा भाजपाने घेतला. तर काँग्रेसने द्रमुकबरोबर असलेली आघाडी तोडल्याने द्रमुक व त्याच्या मित्रपक्षांमध्ये असंतोष आहे. द्रमुक बरोबर एकत्र लढल्यानेच काँग्रेसला तमिळनाडूत लोकसभा, विधानसभेच्या जागा मिळाल्या आणि निकाल जाहीर होताच काँग्रेसने आघाडी तोडून टीव्हीकेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, याचा राग द्रमुकच्या नेत्यांमध्ये आहे. यामुळे इंडिया आघाडीला देखील तडा बसला आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने समर्थन मागण्यासाठी व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याचा दावा इतर छोट्या पक्षांनी केला आहे. विजय यांच्या पक्षाने पारंपरिक पद्धतीने समर्थन मागावे, अशी त्यांची अपेक्षा होती. टीव्हीकेने पाठवलेल्या मेसेजची इतर छोट्या पक्षांकडून खिल्ली उडवण्यात आली.
द्रमुक – अण्णाद्रमुक एकत्र येतील का?
विजय यांच्या पक्षाला कौल देणारे मुख्यत: तरूण आहेत. त्यामुळे या तरूणांनी द्रविड विचारधारेचे राजकारण करणाऱ्या द्रमुक व अण्णाद्रमुक यांना कौल दिला नाही. त्यामुळे द्रमुक व अण्णाद्रमुक हे दोन पक्षांनी देखील सध्या विचारधारा बाजूला ठेवल्याचे म्हटले जात आहे. तर मागच्या दाराने चर्चेला सुरूवात केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकचे आमदार रिसॉर्टमध्ये आहेत. दुसरा पर्याय म्हणून अण्णाद्रमुक सरकार स्थापन करेल. त्या सरकारला द्रमुक बाहेरून पाठिंबा देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मागील अनेक दशकांपासून द्रमुक व अण्णाद्रमुक हे पक्ष एकमेकांविरोधात लढत होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. विजय यांच्या उदयाने द्रमुक व अण्णाद्रमुक मधील संबंधांचाही नव्याने उदय होतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
