BJP DMK Alliance and Tamil Nadu Politics : विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भाजपा विरोधात लढा देणारे लहान व प्रादेशिक पक्ष कमकुवत झाल्याचे या निकालातून दिसते. तसेच लोकसभेत स्वबळाचे बहुमत नसलेल्या भाजपाला यापुढे फायदा मिळू शकतो, असे चित्र आहे. भाजपाला लोकसभेत बहुमत गाठण्यासाठी, विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर भाजपाला कडाडून विरोध करणारे प्रादेशिक पक्ष त्यांच्याच प्रदेशांत दुबळे झाले आहेत. तमिळनाडूत काँग्रेसने इंडिया आघाडीचा घटक असलेल्या द्रमुकची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपाला काही मुद्द्यांवर लोकसभेत द्रमुकचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूतील राजकीय घडामोडींमुळे भाजपाला फायदा?
लोकसभेत एखादे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज भासते. भाजपाचे लोकसभेत २४० खासदार आहेत, तर द्रमुक पक्षाचे २२ खासदार आहेत. काही मुद्द्यांवर द्रमुक व भाजपात एकमत असल्यास त्याचा फायदा आगामी काळात दोन्ही पक्षांना होऊ शकतो. १९९९ ते २००३ दरम्यान भाजपा व द्रमुक हे मित्रपक्ष होते, एनडीएचा भाग होते. घटनात्मक आणि इतर बदल घडवून आणण्यासाठी हे पक्ष काही मुद्द्यांवर एकत्र येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी एक घटनात्मक दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मांडले होते. त्याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. त्यात द्रमुक हा पक्ष आघाडीवर होता. परिणामी भाजपाने आणलेले विधेयक मंजूर झाले नाही. त्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतियांश मते भाजपा तसेच एनडीएला मिळवता आली नाहीत.
तामिळनाडूत सी. जोसेफ विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर काँग्रेस पक्ष टीव्हीकेला समर्थन देत सत्तेत सहभागी झाला. त्यापाठोपाठ डावे पक्ष, इंडियन यूनियन मुस्लीम लिग आणि व्हीसीके या पक्षांनीही विजय यांना समर्थन दिले.
राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरण बदलणार?
द्रमुक पक्षाने काही मुद्द्यांवर भाजपाला समर्थन देण्यास तयारी दर्शवल्याने राष्ट्रीय राजकारणात भाजपाला फायदा होऊ शकतो. भाजपाने तमिळनाडूत फक्त एक जागा जिंकली आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “तमिळनाडूत सुरू असलेल्या घडामोडी भाजपासाठी अत्यंत चांगल्या आहेत. त्यांनी फक्त काँग्रेसला उघडेच पाडले नाही, तर काँग्रेसबाबत इंडिया आघाडीतील इतर पक्षांना देखील सतर्क केले. तसेच त्यांनी भाजपासाठी दरवाजे खुले केले आहेत. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक-अण्णाद्रमुक-भाजपा अशी युती पाहायला मिळू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही”, असे वरिष्ठ भाजपा नेत्याने म्हटले आहे.
भाजपाबरोबर जाण्याचा “पर्याय खुला”
भाजपाबाबत “पर्याय खुले आहेत”, असे द्रमुक पक्षातील एका सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. “तामिळनाडूत स्थापन झालेल्या सरकारकडे असलेले बहुमत अतिशय नाजूक आहे. त्यामुळे आम्ही पर्याय खुले ठेवले आहेत. द्रमुक एक पक्ष म्हणून अजूनही शाबूत आहे. आम्ही संसदेतही भाजपाबरोबर वाटाघाटी करू शकतो”, असे द्रमुक पक्षातील एका खासदाराने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला महत्वाच्या विधेयक आणि मुद्यांवर द्रमुक समर्थन देईल का? असे विचारले असता, “तशी मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. आम्ही भाजपाविरोधात शत्रूची भूमिका स्वीकारली होती, पण आता आम्ही तडजोड करण्यास तयार आहोत. आमचा काँग्रेसवरून विश्वास उडाला आहे. त्यामुळे भाजपाच्या जवळ जाण्यापासून आम्हाला आता कोणी रोखू शकत नाही”, असे द्रमुकमधील खासदाराने म्हटले आहे.
“एक देश, एक निवडणूक”ला द्रमुक समर्थन देणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपासाठी महत्वाच्या असलेल्या “एक देश, एक निवडणूक” या मुद्द्यावर द्रमुक भाजपाला पाठिंबा देऊ शकतो. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी १२९ व्या घटनादुरूस्तीचे विधेयक मांडले जाणार आहे. त्यावर संयुक्त संसदीय समिती सध्या काम करत असून, भाजपा नेते पी.पी. चौधरी हे समितीचे नेतृत्व करत आहेत.
केंद्र सरकारमधील भाजपाबरोबर गेल्यास द्रमुक पक्ष नीट व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प तमिळनाडूत राबवू शकतो. तसेच त्यांचे श्रेय घेऊ शकतो. “आम्ही तामिळनाडूच्या विकासाचे प्रकल्प आणि धोरण इथे राबवू शकू”, असे द्रमुकच्या खासदाराने म्हटले आहे. तामिळनाडूने सातत्याने नीट परीक्षेला विरोध केला आहे. नीट परीक्षा घेताना ग्रामीण भागातील तसेच राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जात नाही, असा द्रमुकचा आरोप आहे.
भाजपाबरोबर द्रमुक एनडीएत सहभागी होणार?
भाजपाबरोबर जाण्यासाठी द्रमुककडे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय महत्व वाढवणे. द्रमुक पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष एम.के. स्टॅलिन हे स्वत: पराभूत झाले आहेत. विजय यांना सत्तेत जाण्यापासून रोखण्याचा द्रमुकने देखील पुरेपूर प्रयत्न केला. अण्णाद्रमुकबरोबर बोलणी सुरू केली. परंतु, द्रमुकच्याबरोबर असलेल्या काँग्रेससह इतर छोट्या मित्रपक्षांनी अण्णाद्रमुकबरोबर जाण्यास विरोध केला. काँग्रेसने दोन दशकांपासून द्रमुकबरोबर असलेली आघाडी तोडली. त्यानंतर संतप्त झालेल्या द्रमुक पक्षाच्या नेत्या कनिमोझी करूणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून लोकसभेतील आसनव्यवस्था बदलण्याची मागणी केली. काँग्रेसबरोबर आसनव्यवस्था नको, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
“काँग्रेस पक्षावर आता विरोधी पक्ष विश्वास ठेवू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेस व काँग्रेसमध्ये आधीपासूनच मतभेद आहेत. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) देखील काँग्रेसवर नाराज आहे. आता समाजवादी पक्ष देखील काँग्रेसबाबत सतर्क झाला आहे”, असे दुसऱ्या एका द्रमुक खासदाराने म्हटले आहे. दरम्यान, भाजपा आणि काँग्रेस विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा पर्याय द्रमुक समोर आहे. तृणमूल काँग्रेस, बीआरएस, आरजेडी आणि वायएसआर काँग्रेस पक्ष या पक्षांची मिळून तिसरी आघाडी तयार होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
