तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (२३ जानेवारी) सुरूवात करत आहेत. चेन्नईपासून ८५ किमी दूर असलेल्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदूरंथगम या गावात मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३.३० वाजता मोदी चेन्नईत पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरने सभास्थळी जाणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी सात थरांची सुरक्षा व्यवस्था त्यांच्याभोवती असणार आहे. ३५०० पोलीस मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
उत्तर तमिळनाडूतून सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके विरोधात भाजपा निवडणूक लढवणार आहे. तमिळनाडूत भाजपाने काही स्थानिक पक्षांशी युती केली आहे. त्या पक्षांमधील प्रमुख नेतेदेखील मोदींबरोबर मंचावर उपस्थित राहणार आहेत. सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरील हलकी वाहने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. तर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे.
पीयूष गोयल यांचे नियोजन
भाजपाचे तमिळनाडू निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मागील तीन दिवसांपासून मोदींच्या सभेसाठी तयारी करत आहेत. तमिळनाडूत जास्तीत जास्त मित्रपक्षांचे नेते मंचावर मोदींबरोबर उभे राहतील असे नियोजन गोयल यांनी केले आहे. त्यामुळे जनतेत भाजपा व मित्रपक्षांमध्ये असलेल्या एकतेचा संदेश जाईल, असा भाजपाचा प्रयत्न आहे. दरम्यान, तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
मोदींबरोबर स्टेजवर कोणते नेते दिसणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मंचावर AIADMK पक्षाचे सरचिटणीस व माजी मुख्यमंत्री एडाप्पदी के. पलानीस्वामी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई, प्रदेशाध्यक्ष नैणार नागेंथ्रन, केंद्रीय राज्य मंत्री एल. मुरूगन हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर PMK पक्षाचे नेते अंबुमणी रामाडोस, AMMK पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरन, तमिळ मणिला काँग्रेस पक्षाचे नेते जीके. वासन, IJK पक्षाचे नेते परीवेंधर, पुधिया निधी काची पक्षाचे नेते एसी शाणमुगघम, तमिळ मक्कल मुनेत्र कळघम पक्षाचे नेते जॉन पांडियन तसेच लहान पक्षांचे नेते केसी थिरूमारन, जगन मुर्ती, एनआर धनपालन, चेल्लामुथू हे नेते मंचावर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपाबरोबर काही नेत्यांनी जुळवून घेण्यास विरोध केला आहे. भाजपाशी संबंध असलेले इतर पक्षांतील काही नेते एनडीएमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, DMDK पक्षाच्या प्रेमलता, PMK पक्षाचे नेते एस. रामाडोस, पुथिया तमिळगम पक्षाचे कृष्णमूर्ती आणि व्हिके शशीकला या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना सोबत घेण्यासाठी भाजपाकडून बोलणी सुरू आहे.
अभिनेता विजयबाबत सौम्य भूमिका
अभिनेता विजय व त्यांच्या पक्षाविरोधात टिका न करण्याचे निर्देश भाजपाने नेत्यांना तसेच मित्रपक्षांना दिले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व त्यांच्या DMK पक्षालाच लक्ष्य करण्याबाबत भाजपाने सूचना केली आहे. तसेच भाजपाकडून थिरूपरंकुद्रम येथील दिवा लावण्यावरून झालेल्या वादाला निवडणुकीत मुद्दा बनवले जाणार आहे.
तमिळनाडूतील सभेसाठी निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ‘तमिळनाडू एनडीएबरोबर आहे.’ असे त्यांनी लिहिले आहे. तसेच तमिळनाडूतील लोक भ्रष्ट कारभार करणाऱ्या डीएमके पक्षाला आता निरोप देणार आहेत, असे मोदींनी पोस्टमध्ये म्हटले.
