बांगलादेशमध्ये जन्म झालेल्या, पण स्वीडनचे नागरिकत्व असलेल्या तस्लीमा नसरीन या तब्बल २० वर्षांनंतर कोलकात्यात येणार आहेत. तस्लीमा नसरीन या ‘द्विखंडित’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत. नोव्हेंबर २००७ मध्ये या पुस्तकावरून त्यांच्या विरोधात हिंसक आंदोलन झाले होते. त्यामुळे त्यांना कोलकात्यातून बाहेर पडावे लागले होते. त्यांच्या लेखनावर अनेकदा टीका होते. १ ऑगस्ट रोजी कोलकात्यात होणाऱ्या साहित्य क्षेत्राशी संबंधित एका कार्यक्रमात तस्लीमा नसरीन उपस्थित राहणार आहेत.

तस्लीमा नसरीन कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार?

कोलकात्यामधील रवींद्र सदन सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम होणार असून तो तीन संस्थांनी आयोजित केला आहे. ‘सेक्युलर मिशन’, ‘पश्चिमबोंगर जोन्नो’ आणि ‘ह्युमन राइट्स बियाँड फ्रंटिअर्स’ या तीन संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकार व ख्यातनाम लेखक शिर्षेंदू मुखोपाध्याय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

“हा कार्यक्रम तीन संस्थांकडून आयोजित करण्यात आला आहे. त्यात आमची संस्थाही आहे. या कार्यक्रमात नसरीन यांच्या कविता व गाणे असतील. मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत”, अशी माहिती ‘पश्चिमबोंगर जोन्नो’ संस्थेचे मोहित रॉय यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

“बंगाल ही देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुलतत्त्ववादी लोकांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना या येथून दूर जावे लागले होते. त्याचे दु:ख आम्हाला होते. मागील सरकारच्या काळातही आम्ही त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले. यावेळी आम्ही मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही नसरीन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही कोलकात्याला भेट देण्याची व कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. बांगलादेशातून हद्दपार केल्यानंतरची वर्षे कशी होती, याबद्दल त्या बोलतील. कोलकाता सोडताना नेमकं काय परिस्थिती होती हे त्या सांगतील. तसेच त्यांच्या कविता वाचून दाखवतील”, अशी माहिती ‘सेक्युलर मिशन’ संस्थेचे ओस्मान मलिक यांनी दिली.

तस्लीमा नसरीन यांच्या लेखनामुळे वाद का होतो?

तस्लीमा नसरीन या सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहेत. २००७ नंतर प्रथमच त्या भारतात येणार आहेत. ‘द्विखंडित’ (बायफरकेटेड) या पुस्तकावरून वाद उद्भवल्यानंतर २००७ मध्ये त्यांच्या विरोधात कोलकात्यात हिंसक आंदोलन झाले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता शहर सोडले.

बांगलादेशात जन्मलेल्या तस्लीमा नसरीन त्यांच्या लेखनामुळे मागील काही दशकांपासून विवादात अडकतात. बांगला भाषेत त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यात कवितासंग्रह, कादंबरी, निबंध आणि खंडात्मक आत्मचरित्राचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य ३० हून अधिक भाषांमध्ये अनुवादीत करण्यात आले आहे.

महिलांचे अधिकार, लैंगिक समानता, पितृसत्ताक नियमांना आव्हान आणि महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार हे मुद्दे नसरीन यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. लज्जा ही त्यांनी लिहिलेली अत्यंत प्रसिद्ध कादंबरी म्हणून ओळखली जाते. ही कादंबरी १९९३ मध्ये प्रकाशित झाली होती. या कादंबरीमुळे नसरीन यांना जागतिक ओळख मिळाली. भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर बांगलादेशात एका हिंदू कुटुंबाचा कसा छळ करण्यात आला, याबाबत या पुस्तकात लिहिण्यात आले आहे.

तस्लीमा नसरीन यांनी बांगलादेश का सोडला?

तस्लीमा नसरीन यांना त्यांच्या लेखनामुळे बांगलादेशात धमक्या मिळत होत्या. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलनेही होत होती. त्यामुळे १९९४ मध्ये त्यांनी बांगलादेश सोडला. त्यानंतर त्या युरोप व उत्तर अमेरिकेत (नॉर्थ अमेरिका) राहू लागल्या. त्यानंतर त्यांनी स्वीडनचे नागरिकत्व घेतले व काही काळ जर्मनीत वास्तव्य केले. १९९८ मध्ये त्यांनी ‘मेयेबेला’ (My Bengali Girlhood) या नावाने आत्मचरित्राचा पहिला खंड लिहिला.

कोलकात्यात हिंसक निदर्शने का झाली?

२००४ मध्ये तस्लीमा नसरीन यांना भारत सरकारने तात्पुरता निवास परवाना दिला. त्यामुळे त्या कोलकात्यात स्थायिक झाल्या. बंगाली वृत्तपत्रांसाठी स्तंभ लिहिणे त्यांनी सुरू केले होते. जून २००६ मध्ये कोलकात्यातील टिपू सूलतान मशि‍दीचे इमाम सईद नूर-उर-रहमान बरकती यांनी तस्लीमा नसरीन यांचे तोंड “काळे” करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले. त्यावेळी अनेक इतर संघटनांनीही तस्लीमा नसरीन यांनी देश सोडावा अशी मागणी केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांना कोलकात्यात लष्कराला पाचारण का करावे लागले?

नोव्हेंबर २००७ मध्ये तस्लीमा नसरीन यांच्याविरोधात कोलकात्यामध्ये हिंसक निदर्शने झाली. ‘ऑल इंडिया मायनोरिटी फोरम’ या संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनांमध्ये शहरातील अनेक भागांमध्ये जाळपोळ तसेच रस्ते बंद करण्यात आले. त्यावेळी कोलकात्यात डाव्यांचे सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करावे लागले होते. त्यानंतर नसरीन यांनी कोलकाता सोडले. मार्च २००८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी आठ महिने त्या नवी दिल्लीत एका अज्ञात स्थळी राहिल्या. आता तब्बल २० वर्षांनी त्या भारतात पुन्हा येणार आहेत.