नितीन पखाले यवतमाळ : विधान परिषदेचे आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाख रूपयांची लाच घेताना मंगळवारी नागपूर येथे एका सरकारी कर्मचाऱ्यासह तथाकथित शिक्षक नेत्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईने राजकीय क्षेत्रासह प्रादेशिक परिवहन खात्यात खळबळ उडाली. कधीही चर्चेत न राहणारे आमदार वझाहत मिर्झा सदर कारवाईमुळे अचानक प्रकाशझोतात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार डॉ. वझाहत मिर्झा हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे रहिवाशी आहेत. काँग्रेसचे तत्कालीन नेते गुलामनबी आझाद यांचे बोट धरून ते राजकारणात आले. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी आमदार मिर्झा काँग्रेस पक्षाच्या तब्बल सहा महत्वाच्या पदांवर पोहोचले. काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद हे १९८० मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले व जिंकले. या काळात गुलामनबी यांचा वझाहत मिर्झा यांचे शिक्षक असलेले वडील आथर मिर्झा यांच्याशी स्नेह जुळला. पुढे गुलामनबी आझाद हे मिर्झा परिवाराचे गॉडफादर झाले. वझाहत यांच्या वडिलांनी अल्पसंख्याक समाजाशी निगडीत अनेक शैक्षणिक संस्थाची गुलामनबी आझाद यांच्या नावानेच उभारणी केली. गुलामनबी आझाद यांच्याशी असलेल्या संबंधाचा उपयोग करत वैद्यकीय शिक्षण होताच वझाहत यांनी थेट दिल्ली गाठली. अल्पसंख्याक समाजातील उच्चशिक्षित तरूण म्हणून काँग्रेसनेही वझाहत मिर्झा यांना संधी दिली. पक्षीय व संघटनात्मक कामाचा कोणताही अनुभव नसताना दिल्लीसह राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी मधूर संबंध ठेवून डॉ. वझाहत मिर्झा काँग्रेस जिल्हाध्यक्ष, विधान परिषद सदस्य झाले. राज्यमंत्री दर्जा असलेल्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष राहिले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचे सदस्‍य आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. मिर्झा यांचा हा राजकीय आलेख पक्षातील कार्यकर्त्यांसह जनसामान्यांनाही अचंबित करणारा आहे.

हेही वाचा >>> राजू शेट्टी, संभाजीराजे यांची लोकसभेची तयारी सुरु

प्रादेशिक परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याविरोधात विधान परिषदेत प्रश्न विचारण्याचे टाळण्याकरिता. मिर्झा यांच्या नावाने औद्योगिक विकास महामंडळात अमरावती येथे टेक्निीशियन असलेल्या दिलीप खोडे याच्यासह तथाकथित शिक्षक नेता व राजकीय कार्यकर्ता शेखर भोयर या दोघांना तब्बल २५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईनंतर आमदार डॉ. मिर्झा यांनी आपण संबंधित दोन्ही आरोपींना ओळखत नसून या प्रकरणाशी आपले काही देणे घेणे नाही, असे माध्यमांना सांगितले. परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यासंदर्भातील प्रश्न आपणच विधिमंडळात उपस्थित केला होता. मात्र आपल्या नावाचा गैरवापर करून हा प्रकार करण्याचा आल्याचा दावा, मिर्झा यांनी केला आहे. डॉ. मिर्झा यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, परंतु, वर्ग तीनच्या एका शासकीय कर्मचाऱ्याची विधान परिषद आमदाराच्या नावाने तब्बल एक कोटींची लाच मागण्याची हिंमत कशी होते, हा औत्सुक्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. शिवाय हा कर्मचारी मुंबईत हिरानंदानी मिडोजसारख्या ऐश्वर्यसंपन्न वसाहतीत वास्तव्यास असल्याने या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केल्यास अनेक बाबी समोर येतील, अशी चर्चा आहे. या घटनेने विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील आमदाराच्या नावाने लाच मागून या पदाची जी शोभा झाली, ती हानी भरून निघणार का, हा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> ‘कसब्या’मुळे भाजप सावध, बापट कुटुंबियांना संधी ?

वझाहत मिर्झा हे पुसदचे असले तरी आमदार झाल्यापासून ते कुटुंबासह नागपूरलाच अधिक वास्तव्यास असतात. आमदारकीचे पाच वर्ष उलटूनही पुसदसह यवतमाळ जिल्ह्यात मिर्झा यांनी कोणतीही ठोस विकासकामे केल्याचे दिसत नाही. जनतेच्या आरोग्याशी निगडीत अशा अभ्यागत मंडळावर राहुनही वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी त्यांना दूर करता आली नाही. जिल्हा काँग्रेस पूर्वीपेक्षाही आता अधिक मरणासन्न अवस्थेत आहे. वझाहत मिर्झा कधीही पक्षाच्या संघटनात्मक लढाईत समोर दिसत नाही. त्यामुळे पक्षातही त्यांच्याबाबत नाराजी आहे. एका अधिकाऱ्यास विधिमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी करून २५ लाख रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणात आमदाराचे नाव आल्याने पुढे काय कारवाई होते याची जिल्ह्यात उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers leader with government employee arrested while in the name of congress mlc wajahat mirza print politics news zws
First published on: 30-03-2023 at 11:46 IST