लोकसभा निवडणुकीला जेमतेम १० दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्ष प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. बिहारचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांचाही प्रचार वेगात सुरू आहे. त्यांच्या हातात आरजेडीची धुरा असून, बिहारमधील इंडिया आघाडीचा ते प्रमुख चेहरा आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव यांनी अनेक ज्वलंत मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. मुलाखतीत तेजस्वी यादव भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण, बिहारमधील सत्ताधारी पक्षाची स्थिती, विरोधकांपुढे असणारे आव्हान यांसारख्या अनेक विषयांवर बोलले.

सामान्य जनताच दुर्लक्षित

निवडणुकीतील भूमिका आणि योजनेबद्दल बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “आमचा मुख्य उद्देश लोकांचं ऐकून घेणं आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं आहे.” ते पुढे म्हणाले, “मी या वर्षी राज्यभर प्रवास केला आणि मला भेटलेल्या प्रत्येकानं सांगितलं की, ते दुर्लक्षित असून, त्यांचं ऐकून घेणारं कोणी नाही, त्यांचा अनादर होतोय. लोकशाहीचा अर्थ म्हणजे लोकांचं शासन आणि त्यांच्याचकडे दुर्लक्ष होत असेल, तर आपण नक्कीच कुठे ना कुठे चुकतोय, हे लक्षात यायला हवं. पंतप्रधान मोदी यांची काम करण्याची जशी पद्धत आहे, त्यात सामान्यांबरोबरच्या संवादाला कुठेही जागा नाही.”

हेही वाचा : ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?

देशातील जनतेनं हे ठरवलं, ते ठरवलं, अशी घोषणा पंतप्रधान व्यासपीठावरून करीत असतात; परंतु मला ते फार विचित्र वाटतं. जनतेला काय करायचं आहे, ते जनतेला ठरवू द्या. इतकी अस्वस्थता का, असा प्रश्न त्यांनी पंतप्रधान मोदींना केला. ते म्हणाले, “देशातील विखुरलेली लोकशाही संरचना आम्हाला पूर्ववत करायची आहे आणि हाच विरोधी पक्षाचा मुख्य उद्देश आहे.”

“एनडीएमध्ये एक नेता आणि बाकी अनुयायी”

निवडणूक निकालात आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतील, असे काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव म्हणाले होते. याच वक्तव्याबाबत ते म्हणाले, “एनडीएमध्ये एक नेता आणि बाकी त्याचे अनुयायी आहेत. लोकसभा निवडणुकीत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात; जे त्यांच्या भागातील प्रश्न आणि समस्या सभागृहात उपस्थित करू शकतात. परंतु, एका व्यक्तीला बघून प्रतिनिधीची निवड केल्यानं संस्थात्मक व्यवस्था कमकुवत होते.” ते पुढे म्हणाले, “निवडणूक निकालातील आश्चर्यकारक बदल पाहण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत तेजस्वी यादव म्हणाले, “सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांसाठी अडचण निर्माण केली जात आहे. त्यांना कोंडीत टाकण्याच्या प्रयत्न केला जात आहे, हे सर्व लोकांना दिसतंय. आम्ही कायदेशीररीत्या लढत आहोत आणि लोकांकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय.”

धार्मिक विषयांधारित प्रचार म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन

राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात का? यावर बोलताना ते म्हणाले, “या मुलाखतीचा संदर्भ आगामी निवडणुकांशी असल्याने, मी हे नक्कीच सांगू शकतो की, जी कोणी व्यक्ती धर्म किंवा धार्मिक विषयांना त्यांच्या प्रचाराचा मुद्दा म्हणून वापरत आहे, ती प्रत्येक व्यक्ती आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करीत आहे. भाजपा हा धर्माचा ठेकेदार नाही आणि त्यासाठी कोणाला भाजपाकडून मान्यता किंवा प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक नाही. धर्म हा लोकांसाठी महत्त्वाचा आहे यात शंका नाही; पण राजकारणात धर्म आणू नये.”

“रामनवमीच्या वेळी पापी लोकांना शिक्षा करा”, असे पंतप्रधान मोदी यांनी नवादा येथील रॅलीत लोकांना सांगितले होते. त्यावर तेजस्वी यादव म्हणाले, “निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांचे भाषण लिहिणारे योग्यता आणि समतोलपणा गमावून बसतात. जर लोकांनी पंतप्रधानांचे म्हणणे गांभीर्याने घेतले, तर ते आणि त्यांचा पक्षच अडचणीत येईल.”

आरजेडी आजवर MY (मुस्लिम-यादव) मतदारांना लक्ष्य करीत आली आहे. परंतु, यंदा पक्ष याच्या पलीकडे जाताना दिसत आहे. यावर तेजस्वी यादव म्हणाले, “आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. आमचा अजेंडा व्यापक, सर्वसमावेशक व प्रगतिशील आहे. लोकांच्या हे नक्कीच लक्षात येईल की, सामाजिक न्याय आणि समानतेच्या समस्यांचं निराकरण करणं प्रत्येकाच्या हिताचं आहे.”

“भाजपानं घराणेशाहीवर बोलू नये”

वडील लालू प्रसाद यांच्या सारण गडावरून तेजस्वी यांची बहीण रोहिणी आचार्य निवडणूक लढविणार आहे. घराणेशाहीच्या राजकारणावरून आरजेडीवर वारंवार आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर ते म्हणाले, “राजकारण, व्यवसाय आणि इतर काही क्षेत्रांत कार्यकर्ते आणि आपले हितचिंतक यांच्या भावना लक्षात घेऊनही असे निर्णय घेतले जातात. कोणतंही कुटुंब हे पक्ष, कार्यकर्ते आणि लोकांच्या पाठिंब्याला नकार देण्याइतकं मोठं किंवा सामर्थ्यवान नाही. असे निर्णय सर्वांच्या सल्ल्यानंच होतात. मी माझ्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा देतो. हे सर्व आरोप पोकळ आहेत आणि विशेषतः भाजपाकडून करण्यात आलेल्या या आरोपांना काहीही अर्थ नाही.”

हेही वाचा : महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?

विरोधकांच्या शब्दांना किंमत देत नाही!

मुख्यमंत्री नितीश कुमार १० लाख नोकऱ्यांच्या दाव्यावरून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत का? यावर बोलताना ते म्हणाले, “आम्ही आमच्या ध्येयावर ठाम आहोत. आमचे विरोधक आमच्यावर टीका करीत आहेत. परंतु, आम्ही व्यापक रोजगार कार्यक्रमासाठी आधीच एक ब्ल्यू प्रिंट तयार करीत आहोत. आम्ही प्रत्येक तपशिलावर काम करीत आहोत; जेणेकरून आम्ही आमच्या वचनाची पूर्तता करू शकू. कोण काय म्हणतंय याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. कारण- त्यांच्या शब्दांना आम्ही काहीही किंमत देत नाही. माझे लक्ष विशेषतः तरुण वर्गावर आहे; ज्या तरुणांना भेटतो आणि रोज पाहतो त्यांच्यावर केंद्रित आहे”, असे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचवण्यावर आम्ही भर देत आहोत. आम्ही राज्यघटनेला धोका पोहोचवू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.