माहिती तंत्रज्ञान शाखेतील अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर नोकरी करीत असताना अचानकपणे राजकारणात आलेल्या तेजस्वी बारब्दे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून सध्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेती, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- श्रद्धा ठाकूर : कुशल संघटक

तेजस्वी बारब्दे यांनी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी सुरू केली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एक वादळ आले. सासरी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना त्यांना करावा लागला, पण त्यातून स्वत:ला सावरत तेजस्वी बारब्दे यांनी स्वतंत्र बाण्याने आपली वाटचाल सुरू केली. मध्‍यमवर्गीय उच्‍चशिक्षित कुटुंबातील तेजस्‍वी बारब्‍दे यांच्‍या आयुष्‍याला याच ठिकाणी कलाटणी मिळाली. त्‍यावेळी हाती नोकरी नव्‍हती. पण, ज्ञान, कौशल्‍य होते. त्‍यांनी घरीच गणित विषयाचा शिकवणी वर्ग सुरू केला. ज्‍यांना शुल्‍क देणे परवडत नाही, अशा गरीब मुलांना नि:शुल्‍क शिकवण्‍याची सोय उपलब्‍ध करून दिली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी चळवळीतील सहभाग, वक्तृत्वकला आणि जोडीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे ज्ञान यातून नंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांना पक्षाने प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली.

हेही वाचा- “नोटबंदी, जीएसटी धोरणे नाही, तर लहान व्यापाऱ्यांना…”, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

चंद्रपूर खल्लार हे त्यांचे मूळ गाव. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात येताच, तेजस्वी यांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला. दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या प्रदुषणाचा विषय त्यांनी हाती घेतला आणि नदीच्या पुनरूज्जीवनासाठी चंद्रभाग पीपल्स फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. याच तालुक्यातील आराळा या गावातील तलावात गाळ साचल्याने गावात पाणी शिरून मोठे नुकसान होत होते. त्यांच्या पुढाकाराने श्रमदानातून तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला. लोकसहभागातून अशा प्रकारची कामे करण्यावर तेजस्वी बारब्दे यांचा भर राहिला आहे. चंद्रभागा नदीला २००७ मध्ये पूर आला होता. दर्यापुरात पूरसंरक्षक भिंतीही वाहून गेल्या होत्या. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना तेजस्वी बारब्दे यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि तीन पूरसंरक्षक भिंती उभारण्याच्या कामांना मंजूरी मिळाली.

हेही वाचा- प्रवीण दटके : निष्ठावंत कार्यकर्ता

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला आहे. समाजमाध्यमांतून हे प्रश्न त्यांनी लोकांसमोर मांडले आहेत. ग्रामविकासातून लोक जोडता येतील, ही त्यांची संकल्पना आहे. तेजस्वी बारब्दे यांनी विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला होता, अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यातील संघर्षातून यशस्वीपणे बाहेर पडून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पाठिंब्यावर राजकीय क्षेत्र निवडले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswi barabde state spokesperson of ncp print politics news dpj
First published on: 25-11-2022 at 10:59 IST