विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात प्रचाराला वेग आला आहे. या राज्यात येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे आता काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यासारखे बडे नेते तेलंगणात जाऊन सभा घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत देश स्वत:ला विश्वमित्र मानतो- मोदी

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२६ नोव्हेंबर) तुपराण आणि निर्मल या भागांत सभा घेतल्या. त्यांनी हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या योग आणि आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ‘कान्हा शांती वनम’ येथे एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी बोलताना “ज्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले, त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला केला. देशाच्या याच समृद्ध वारशाचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारकडून केला जात आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली आहे. सध्या योग असो किंवा आयुर्वेद, जगभरात भारताची चर्चा होत आहे. भारत हा देश स्वत:ला विश्वमित्र मानतो. जगातील इतर देशही आता भारताला मित्र मानत आहेत,” असे मोदी म्हणाले.

“गरीब, मच्छीमार, शेतकरी, तरुण, युवक यांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. या वर्गाच्या इच्छा पूर्ण करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असेही मोदी म्हणाले.

केसीआर यांना तेलंगणार राज्य त्यांच्या मालकीचे वाटते- मोदी

गजवेल विधानसभा मतदारसंघातील तुपराण या भागातही मोदी यांनी एका सभेला संबोधित केले. बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर गजवेलसह अन्य एका मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी बोलताना मोदी यांनी केसीआर यांच्यावर सडकून टीका केली. “तेलंगणा राज्य हे माझ्या मालकीचे आहे, असे केसीआर यांना वाटते. केसीआर दोन जागांवरून का लाढत आहेत. राहुल गांधी यांनीदेखील दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना अमेठी सोडून केरळमध्ये जावे लागले. या मतदारसंघातून बाजपाच्या वतीने इटेला राजेंदर हे निवडणूक लढवत आहेत. शेतकरी आणि गरीब जनता केसीआर यांच्यावर रागावलेली आहे. याच कारणामुळे केसीआर यांनादेखील गजवेल सोडून जावे लागेल,” असा दावा मोदी यांनी केला.

केसीआर यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली- मोदी

२००८ सालच्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यावेळी मोदी यांनी उल्लेख केला. त्यावेळचे मनमोहन सिंग सरकार सक्षम नव्हते, असा आरोप मोदी यांनी केला. तसेच निर्मल येथे बोलताना त्यांनी तेलंगणा राज्या वेगळे झाले असले तरी या राज्यातील मागासवर्गाची दुर्दशा अजूनही संपलेली नाही. तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर केसीआर यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. केसीआर यांनी काँग्रेसशी मिळून मद्य घोटाळा केला, असा आरोप मोदी यांनी केला.

अमित शाह यांची काँग्रेस, बीआरएसवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील रविवारी मटकल, मुलुगू आणि भोंगीर या तीन भागांत तीन सभा घेतल्या. बीआरएस आणि काँग्रेस यांनी गुप्तपणे हातमिळवणी केलेली आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला.

केसीआर यांनी तेलंगणासाठी काय केले- राहुल गांधी

तर राहुल गांधी यांनी आंदोले येथे एका सभेला संबोधित करताना बीआरएसवर टीका केली. “काँग्रेसने तेलंगणासाठी काय केले? असे केसीआर विचारतात. मात्र केसीआर यांनी तेलंगणासाठी काय केले? ते सध्या तेलंगणात सर्वांत भ्रष्ट सरकार चालवत आहेत. आम्ही तेलंगणाच्या जनतेला सहा प्रमुख आश्वसनं दिली आहेत. सतेत्त आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही या आश्वासनांची अंमलबजावणी करू. या सहा आश्वासनांच्या संदर्भाने आम्ही कायदा लागू करू,” असे राहुल गांधी म्हणाले. मोठे जमीनदार आणि सामान्य जनता यांच्यात हा लढा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील तेलंगणात जाऊन सभांना संबोधित केले. आम्ही सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू, असे आश्वासन आदित्यनाथ यांनी दिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana assembly election 2023 rahul gandhi narendra modi amit shah campaign prd
First published on: 27-11-2023 at 13:30 IST