scorecardresearch

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची उद्या राज्यात पहिली सभा, जोरदार वातावरणनिर्मिती

१५ महिन्यांनीच चंद्रशेखर राव यांनी पक्षविस्तारासाठी प्रथम महाराष्ट्राची निवड केल्यामुळे येत्या रविवारी (दि.५) होणारी त्यांची सभा यशस्वी करण्यासाठी तेलंगणातील मोठी फौज नांदेडच्या भूमीवर सक्रिय झाली आहे.

Telangana Chief Minister, Bharat Rashtra Samithi, President, Chandrasekhar Rao, public meeting, Nanded
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची उद्या राज्यात पहिली सभा, जोरदार वातावरणनिर्मिती ( संग्रहीत छायाचित्र )

संजीव कुलकर्णी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या पक्षविस्ताराचे पहिले पाऊल म्हणून राज्यात पक्षविस्ताराकरिता स्वत: चंद्रशेखर राव हे रविवारी महाराष्ट्रात येत आहेत. रविवारी नांदेडमध्ये होणारी सभा यशस्वी करण्याकरिता भारत राष्ट्र समितीच्या वतीने जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पहिल्या जाहीर सभेची वातावरण निर्मिती करण्यासाठी या पक्षाचे खासदार बी.बी.पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि प्रमुख नेते नांदेड व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. मुस्लिमबहुल भागात त्यांच्या सभा व बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. के.चंद्रशेखर राव हे गेल्या ९ वर्षांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. स्वतंत्र तेलंगणासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून मोठा लढा दिला होता. २०१४ साली ‘टीआरएस’ या नावाने ओळखला जाणारा त्यांचा प्रादेशिक पक्ष सत्तेमध्ये आला. पक्षस्थापनेच्या आठ वर्षांनंतर त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे केले. त्यानंतर १५ महिन्यांनीच त्यांनी पक्षविस्तारासाठी प्रथम महाराष्ट्राची निवड केल्यामुळे येत्या रविवारी (दि.५) होणारी त्यांची सभा यशस्वी करण्यासाठी तेलंगणातील मोठी फौज नांदेडच्या भूमीवर सक्रिय झाली आहे.

हेही वाचा… शिवसेनेचे आमदार वैभ‌‌‌‌व नाईक आणि राजन साळवींच्या सरकार हात धुवून मागे लागले

भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या चमूतील भीमराव बसवंतराव अर्थात बी.बी.पाटील हे जहिराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून त्यांची सासूरवाडी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचा आधीपासून चांगला संबंध आहे. मागील आठवड्यापासून ते नांदेड जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या पक्षांमधील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बीआरएसच्या विस्ताराची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी देगलूरचे माजी नगराध्यक्ष विवेक केरूरकर यांनाही ते भेटले. बीआरएसच्या आमदारांपैकी बालका सुमन, विठ्ठल रेड्डी, शकीलभाई, हनुमान शिंदे, जगू रामन्ना हे सध्या नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. त्याशिवाय पक्षाचे इतर नेते तसेच महाराष्ट्राचे समन्वयक माणिक कदम (परभणी) यांनी वेगवेगळ्या भागात सभा-बैठका घेऊन वातावरण निर्मिती चालवली आहे. बुधवारी रात्री शहराच्या देगलूर नाका भागातील बीआरएसच्या सभेला मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा… राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे रविवारी सकाळी १० वाजता विशेष विमानाने नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. विमानतळावरून ते सचखंड गुरूद्वारात जातील. त्यानंतर त्यांची जाहीर सभा दुपारी १ वाजता रेल्वेस्टेशन समोरील पटांगणावर होणार आहे. सभा झाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:03 IST
ताज्या बातम्या