scorecardresearch

चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा

स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेली तरी देश आणि लोकांना आवश्यक ते मिळालेले नाही, असे सांगत राव यांनी काँग्रेससह भाजपवर तोफ डागली.

Chandrasekhar Rao nanded
चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा (Photo: Twitter/@TelanganaCMO)

हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक नांदेड नगरीमध्ये रविवारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचा गुलाबी झेंडा रोवला. या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी ‘अबकी बार, किसान सरकार..’ असा निर्धार महाराष्ट्रातील पहिल्या जाहीर सभेत व्यक्त केला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेली तरी देश आणि लोकांना आवश्यक ते मिळालेले नाही, असे सांगत राव यांनी काँग्रेससह भाजपवर तोफ डागली.

तेलंगणातील ‘बीआरएस’ पक्षाच्या विस्ताराची पहिली सभा नांदेडमध्ये घेण्याचा मनोदय दीड महिन्यांपूर्वी व्यक्त केल्यानंतर आवश्यक त्या तयारीनिशी नांदेडमध्ये दाखल झालेल्या के.सी.राव यांनी पुढच्या १० दिवसांमध्ये राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या ‘किसान कमिट्या’ स्थापन करण्याची घोषणा यावेळी केली. याची सुरुवात छत्रपती शिवाजी राजेंचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावरून होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील सध्याची स्थिती बदलायची असेल तर ते शेतकर्यांचे सरकार आल्यावरच बदलेल, हा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला.

हेही वाचा – आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धरमैया यांचा मोठा निर्णय; म्हणाले, “ही निवडणूक…”

नांदेड रेल्वेस्थानकाजवळील गुरुद्वारा बोर्डाच्या पटांगणावर झालेल्या ‘बीआरएस’च्या या पहिल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीपासून बीड-नगरपर्यंतच्या वेगवेगळ्या पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश दिल्यानंतर के.सी.राव यांनी उपस्थित जनसमुदायाशी सुमारे ४० मिनिटं संवाद साधला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मरण करून राव यांनी आपल्या पक्षविस्ताराची, त्यामागच्या उद्दिष्टांची माहिती दिली. देशाने ७५ वर्षांत वेगवेगळ्या नेत्यांची, वेगवेगळ्या पक्षांची सरकारने पाहिली. जनतेने त्यांची मोठमोठी भाषणे ऐकून त्यांना सत्ता दिली, तरी स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही पाणी, वीज आणि इतर प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाहीत. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवते, पण त्यावर कोणताही पक्ष विचार करत नाही, म्हणून ‘बीआरएस’ने ‘अबकी बार किसान सरकार’चा नारा दिला असल्याचे राव यांनी नमूद केले.

आपल्या सविस्तर भाषणात ‘बीआरएस’ सरकारतर्फे तेलंगणा राज्यात शेतकरी आणि इतर समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी तसेच आर्थिक लाभांच्या योजनांची माहिती देत, हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व इतर राज्यांनी आजवर का केले नाही, असा सवाल राव यांनी केला.

राव म्हणाले की,”आमची मांडणी साधी, सरळ आहे. देशात शेतकरी व शेतमजुरांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. आमचा नारा त्यांनी शांतपणे समजून घेतला तर शेतकऱ्यांचे सरकार आणणे असंभव नाही. भारत बुद्धिजिवींचा देश आहे, बुद्दूंचा नाही. वेळ आली तेव्हा भल्याभल्यांना दूर लोटण्याचे काम या वर्गाने केले. आज देशात आणि इतर राज्यांत ती वेळ आली आहे. शेतकरी बांधव केवळ नांगरधारी नाही तर ते कायदे मंडळातही येऊ शकतात हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे.”

हेही वाचा – Tripura Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार

निवडणुका आल्या की, पक्ष जिंकतो, नेता जिंकतो, सत्तेवर येतो पण तेथे जनता पराभूत झालेली असते. असे आजवर होत आले, पण यापुढे जनतेला जिंकायचे आहे, असा मंत्र देत जनता एकवटली तर पुढील काळात आपण जगातील प्रबळ शक्ती होऊ शकू, असा आशावाद राव यांनी जागवला.

पाऊस, पाणी आणि इतर संसाधनांचा संपूर्ण तपशील राव यांनी उपस्थितांसमोर मांडला, पण आधी अनेक वर्षे काँग्रेस आणि आता भाजप या पक्षांनी ७५ वर्षांत मुलभूत गोष्टींत देशाला परिपूर्ण केले नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला, तो आता ‘जोक इन इंडिया’ झाल्याची टिप्पणी करून देशातल्या बाजारपेठेत रंग, मांजा, दिवे, फटाके अशा अनेक वस्तू चीनहून येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मी मांडत असलेल्या मुद्यांवर विचार करा, आपापल्या गावांमध्ये जाऊन त्यावर चर्चा करा आणि मग निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली.

आपल्या देशात साधने, संपत्ती आणि धनाची कमतरता नाही. कमतरता आहे ती मनाची. मागील ८ वर्षांत आम्ही तेलंगणात जे करून दाखविले ते महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये करायचे असेल तर सर्वत्र ‘बीआरएस’चा गुलाबी झेंडा फडकला पाहिजे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांपासून आपण करूया, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले.

हेही वाचा – “शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगारांना दरमाहा १००० रुपये”, त्रिपुरा निवडणुकीसाठी TMC कडून ‘बंगाल मॉडेल’चं वचन

स्वामी रामानंद तीर्थ यांचा राव यांना विसर

तेलंगणासह आजच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्व सध्या सुरू आहे, पण के.चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणात त्याचा किंवा हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या व नेतृत्व केलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 23:34 IST