तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपावर टीका केली आहे. रेवंत रेड्डी यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नावाचा भाजपा नेत्यांकडून निवडणुकीच्या काळात वारंवार उल्लेख केला जातो, असे म्हटले आहे. राजकीय फायद्यासाठी भाजपाकडून ओवैसींच्या नावाने मतदारांना भीती दाखवली जाते, असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना रेड्डी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्थानिक निवडणुका या राष्ट्रीय किंवा जातीय मुद्द्यांवर लढण्यापेक्षा नागरी समस्यांवर लढणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसे आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे. केंद्रातील मंत्री महानगरपालिकेशी संबंधित दैनंदिन समस्या सोडवू शकत नाहीत, असे रेड्डी म्हणाले. ११६ नगर पालिका व सात महानगरपालिकांमधील मतदारांनी प्रशासन, भविष्यातील विकास व स्थानिक मुद्द्यांना लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. रेवंत रेड्डी यांनी भाजपावर टीका करताना म्हटले, भाजपाकडून धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे. तेलंगणाला भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. ही भाजपाची वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारी बाब आहे, असे रेवंत रेड्डी म्हणाले.

“भाजपाकडून दक्षिणेतील राज्यांवर अन्याय”

रेवंत रेड्डी म्हणाले, केंद्रीय मंत्री ज्यावेळेस राज्यात येतात तेव्हा लाखो करोडोंचा निधी मंजूर झाल्याचे सांगतात. परंतु, टॅक्सच्या स्वरूपात तेलंगणा राज्य केंद्र सरकारला देत असलेल्या रकमेचा फक्त काही भाग केंद्र सरकार तेलंगणाला परत देत आहे. तेलंगणा जर एक रूपया केंद्र सरकारला देत असेल तर केंद्र सरकार फक्त ४२ पैसे तेलंगणासाठी देत आहे. कर्नाटकाला १६ पैसे, तामिळनाडूला २६ पैसे, केरळला ४९ पैसे केंद्र सरकार देते. भाजपा दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय करत आहे. आकडेवारीतून स्पष्टपणे दिसते की तेलंगणाला हक्क असलेला वाटा दिला जात नाही. अशी टीका रेवंत रेड्डी यांनी भाजपावर केली आहे.

“BRS पक्षाचे नेते कोणत्या तोंडाने मत मागत आहेत?”

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षावर देखील टीका केली. रेड्डी म्हणाले, बीआरएस पक्षाची मागील दहा वर्ष तेलंगणात सत्ता होती. त्यांचे नेते आता समस्या सोडवण्यासाठी मत मागत आहेत. सरपंचापासून ते महानगरपालिकेपर्यंत बीआरएस पक्षाची सत्ता होती. केसीआर, केटीआर व हरिश राव हे नेते वर्तमानातील समस्यांसाठी जबाबदार नाहीत का? ते आज कोणत्या तोंडाने मत मागत आहेत? असा सवाल रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केला.

“असदुद्दीन ओवैसी ही भाजपाची लाइफलाइन”

काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, “हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे. जर तु्म्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यासाठी फक्त एकच देव आहे, तो म्हणजे असदुद्दीन ओवैसी. ते रामाचं नाव कधीकधी घेतात, पण दररोज ते ज्यांच्यापुढे झुकतात ते असदुद्दीन ओवैसी आहेत. लोकांना लाइफलाइनबाबत बोलताना तु्म्ही ऐकले असेल, तशीच त्यांची (भाजपाची) लाइफलाइन असदुद्दीन ओवैसी हे आहेत. त्यांना ओवैसी यांचे नाव न घेता रामाचे नाव कितीवेळा आठवते? आणि ओवैसी यांचे नाव कितीवेळा त्यांना आठवते ते पाहा. याचा विचार व्हायला हवा.” भाजपासाठी फक्त असदुद्दीन ओवैसी हेच देव असल्याचे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे.

“भाजपाकडून ओवैसी यांचा राजकीय ‘लाइफलाइन’ म्हणून वापर”

काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, भाजपाकडून ओवैसी यांचा राजकीय ‘लाइफलाइन’ म्हणून वापर केला जातो. त्यांच्या नावाचा सतत भाजपा नेत्यांकडून उल्लेख केला जातो. जर ओवैसी यांच्यामुळे खरंच धोका असेल तर केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये असलेले भाजपा सरकार ओवैसी यांच्या विरोधात कारवाई का करत नाही? असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपाकडून ओवैसी यांचे नाव घेत विभाजनाचे राजकारण केले जाते, अशी टीका रेड्डी यांनी केली.

बीआरएस पक्षाचे नेते हे गांजा किंवा अंमली पदार्थांचे सेवन केलेल्या व्यक्तीप्रमाणे अंहकाराने व द्वेषाने बोलायचे अशी घणाघाती टीका रेड्डी यांनी केली. तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा व बीआरएस या तीन पक्षांमध्ये लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरूवात झाली आहे. केंद्र व राज्यांमधील संबंधांचा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जात आहे.