नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये गृहमंत्रीपद आड आल्याने शपथविधी लांबणीवर पडला आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीमध्ये दाखवली असली तरी, गृहमंत्रीपदाबाबत शिंदे ठाम असल्याचे समजते.
दिल्लीतील शहांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार थेट विमानतळाकडे रवाना झाले. शिंदे मात्र रात्री दीडनंतर मुंबईला रवाना झाले. ‘मुंबईमध्ये शुक्रवारी महायुतीची बैठक होईल, त्यानंतर मंत्रिपदांबाबत चित्र स्पष्ट होईल’, असे शिंदे यांनी विमानतळाकडे जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले होते. शिंदे यांच्या विधानावरून महायुतीच्या मंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >>>काँग्रेसचा ईव्हीएमवरील राग अनाठायी; पराभव होणार हे अंतर्गत सर्वेक्षणातून झालं होतं स्पष्ट
नव्या मंत्रीमंडळामध्ये फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बदलले जाणार असून, शिंदे सरकारमधील मंत्रिपदे व खाती महायुतीतील घटक पक्षांकडे कायम ठेवली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे भाजपकडे महसूल, उच्चशिक्षण, विधि, उर्जा, ग्रामीण विकास ही खाती कायम राहतील. तर, शिंदे गटाकडे नागरी विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्याोग, आरोग्य तसेच अजित पवार गटाकडे अर्थ, नियोजन, सहकार, शेती या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पुन्हा दिली जाईल. फक्त गृहमंत्रालयावरून भाजप व शिंदे गटामध्ये वाद तीव्र झाला आहे.
हेही वाचा >>>काँग्रेसचा ईव्हीएमवरील राग अनाठायी; पराभव होणार हे अंतर्गत सर्वेक्षणातून झालं होतं स्पष्ट
उपमुख्यमंत्रीपदावर तडजोड!
शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे होते. त्यामुळे फडणवीसांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद सोडण्याची तयार नाही. या तिढ्यामुळे शहांच्या बैठकीत मंत्रीमंडळ स्थापनेवर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते. मात्र, भाजप गृहमंत्रीपद कधीही हातून जाऊ देणार नाही. त्यामुळे शिंदे गटाने उपमुख्यमंत्रीपदावर तडजोड करावी, असे मत महायुतीतील नेत्याने व्यक्त केले.
प्रफुल पटेल, श्रीकांत शिंदेंना मंत्रीपदे?
● शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा झाली असून, ४३ मंत्रीपदांपैकी भाजपकडे २०-२३, शिंदे गटाकडे ११ व केंद्रात १ मंत्रिपद आणि अजित पवार गटाकडे ९ व केंद्रात १ मंत्रिपद अशी वाटणी होण्याची शक्यता आहे. शिंदे व पवार गटाला प्रत्येकी एक मंत्रिपद केंद्रात दिले जाणार असल्यामुळे श्रीकांत शिंदे व प्रफुल पटेल यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
● राज्यात शिंदे सरकारमध्ये २८ मंत्री होते व शिंदेंकडे सर्वाधिक ११, भाजपकडे ९ तर अजित पवार गटाकडे ८ मंत्रिपदे होती. यावेळी भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या वाढेल. मात्र, शिंदे व पवार गटाकडील मंत्रिपदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.