आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर केलेल्या सूचक पोस्टमुळे ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… राज्यसभेच्या निवडणुकीत चार जागांवर उमेदवार देताना भारतीय जनता पक्षाकडून धक्कातंत्राचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले… अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करताना आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली… ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावरील बदनामीचा खटला मागे घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे बंधूंच्या एकीला तडा?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर केलेल्या सूचक पोस्टमुळे ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणुका पार पडताच मनसे आणि ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांवरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना आणखीनच बळकटी मिळाली आहे. कोत्या मनाच्या प्रवृतींकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांचा हा रोख ठाकरे गटाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या धक्कातंत्राची चर्चा
राज्यसभेच्या निवडणुकीत चार जागांवर उमेदवार देताना भारतीय जनता पक्षाकडून धक्कातंत्राचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या सात जागांसाठी राज्यात लवकरच निवडणूक होणार आहे. तशी घोषणाही राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीला सहा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला राज्यसभेच्या चार जागा येणार आहेत. या चार जागांसाठी भाजपाकडून धक्कातंत्र वापरले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह आणखी तीन दिग्गज नेत्यांची नावे राज्यसभेच्या शर्यतीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपा ऐनवेळी धक्कातंत्राचा काय वापर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा : राष्ट्रवादीतील भाजपचे लोक कोण? बच्चू कडूंच्या आरोपामागील संकेत
एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या अचानक दौऱ्यामागचे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाले आहेत का? असे तर्कवितर्क लावले जात आहे. शिंदे जेव्हा नाराज होतात किंवा मोठ्या राजकीय निर्णयाच्या तयारीत असतात, तेव्हा ते शांततेच्या शोधात आपल्या गावी जातात. यापूर्वीही त्यांच्या दरे गावातील दौऱ्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळेच शिंदे यांचा विद्यमान दौराही ‘विश्रांती’ म्हणून नसेल, असा अंदाज काहींनी बांधला आहे. काहींनी शिंदेंच्या या दौऱ्याचे मुख्य कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून निर्माण झालेला जटील पेच असल्याचा तर्क लावला आहे. साताऱ्यातील सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आणि अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी शिंदे यांनी थेट आपल्या कार्यक्षेत्रातून सूत्रे हलवण्याचे ठरवले असावे, असा कयास वर्तवला जात आहे.
केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करताना आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अपघातग्रस्त विमान कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे आणि त्यात सत्तेतल्या लोकांचा समावेश आहे. शिवाय ज्या उद्योगपतींचे राजकीय कनेक्शन आहे त्यांचाही या कंपनीत सहभाग आहे. बारामती विमान अपघातात एक राजकीय आणि दुसरे व्यावसायिक षडयंत्र असू शकते, असा दावाही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर मोदी-शाह यांनी लक्ष घातले पाहिजे. त्याबाबत आम्ही पंतप्रधान मोदींना ईमेलद्वारे पत्र पाठणार असल्याचे पवार म्हणाले. केंद्रीय नागरी हवाई मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा, अशी आमची मोठी मागणी आहे. मोदी-शाहांकडे आमची ही मागणी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : महापौर निवडीत भाजपाचे सहा नगरसेवक फुटले; ठाकरे शिंदेंना का भेटले? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…
भुसे यांनी बदनामीचा खटला घेतला मागे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावरील मानहानीचा खटला मागे घेतला. संजय राऊत यांनी ‘सामना’तून मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहारात १७८ कोटींचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्याविरोधात भुसे यांनी मालेगाव येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. यापूर्वीच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. शनिवारी न्यायालयात हजर राहण्यापूर्वी राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतल्याचे माध्यमांना सांगितले. यादरम्यान दोन्ही नेते एकाचवेळी गप्पा मारत न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडल्याचे दिसून आले.
