‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली तरी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याबाबत काहीच ठोस संकेत दिलेले नसल्याने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूची एकी आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये कायम राहणार का, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर एकत्र आले. उभयतांनी मधल्या काळात परस्परांवर टीका केली होती. राज ठाकरे यांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे शक्य झाले नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे शक्य झाले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी ही एकी कायम राहणार का, हा खरा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी हे उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले. आपल्या भाषणात एकी कायम ठेवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्याआधी राज ठाकरे यांचे भाषण झाले पण त्यांनी शिवसेनाबरोबर एकीवर ठोस असे काहीच भाष्य केले नाही. ‘कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे’ या आपल्या मुलाखतीची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.
उद्धव आणि राज ठाकरे यांची ही एकी कायम राहणार का याचा भल्याभल्यांना प्रश्न पडला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. यामुळेच कदाचित भाजपलाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहणे सोयीचे वाटत असावे. कारण ठाकरे बंधू एकत्र लढल्यास एकगठ्ठा मराठी मते ठाकरे बंधूंकडे वळतील आणि त्यातून शिंदे यांचे मोठे नुकसान होईल. शिंदे यांचे राजकीय महत्त्व वाढू नये, असाच भाजपमधील एका गटाचा प्रयत्न असू शकतो.
ठाकरे बंधू एकत्र येण्यात मुंबईतील जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल. कारण मराठीबहुल प्रभागांचे वाटप कसे होते हे महत्त्वाचे असेल. दादर, माहिम, मागाठणे, घाटकोपर अशा काही भागांतील प्रभागांमध्ये शिवसेना आणि मनसे दोघेही दावेदार असतील. एक पाऊल मागे कोणी घ्यायचे हा प्रश्न निर्माण होईल.
२२७ प्रभागांचे उभयतांनी समसमान वाटप केले तरी मराठी बहुल प्रभागांची वाटण कशी होणार यावर सारे अवलंबून असेल. मुंबईतील ३० ते ३२ टक्के मराठी मतांवर महानगरपालिका जिंकणे कठीण आहे. त्यासाठी अन्य मतेही आवश्यक ठरतील. शिवसेनेला काही प्रमाणात मुस्लीम, उत्तर भारतीयांचे मते मिळू शकतात. पण मनसेला मुस्लीम अथवा उत्तर भारतीयांची साथ मिळणे कठीण आहे.
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भाजपची भूमिका महत्त्वाची असेल. राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबर जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न असतील. यामुळे मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी निवडणुकीत एकत्र राहण्याचा पल्ला लांबचा आहे.