scorecardresearch

ठाकरे गटाकडून सांगलीत विधानसभा विजयाचे लक्ष्य, मात्र संघटना बांधणीचे काय?

राऊत यांचे वक्तव्य पाहता सांगली तसेच मिरजवर ठाकरे गटाने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

uddhav thackrey sangli
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिगंबर शिंदे

सांगली : खासदार संजय राऊत यांनी खानापूर आटपाडीसह सांगली, मिरजेतील पुढचे आमदार शिवसेनेचेच म्हणजे ठाकरे गटाचेच असतील असा निर्धार सांगली येथील शिवगर्जना यात्रेत व्यक्त केला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही या गटाची ताकद अद्याप म्हणावी तशी दिसलेली नाही. त्यामुळे आमदार आणण्यासाठी पक्षाला जोरदार बांधणी करावी लागणार आहे. राऊत यांचे वक्तव्य पाहता सांगली तसेच मिरजवर ठाकरे गटाने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

राऊत यांचा सांगली दौरा यशस्वी झाला असे गर्दीवरून दिसून आले. मात्र, ही गर्दी केवळ राऊत काय बोलतात हे ऐकण्यासाठीच अधिक होती. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर दौरा केला. मात्र त्यात सांगलीचा समावेश नव्हता. ठाकरे गटाला सांगली जिल्ह्यात ताकद वाढवावी लागणार आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या महापालिका क्षेत्रात या गटाचा एकही नगरसेवक नाही, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पाटी कोरीच आहे.

हेही वाचा >>> “खेडमधील सभेचा शिवसेनेला नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला…” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणजे खानापूर-आटपाडीचे अनिल बाबर. तेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी असल्याने त्या तालुक्यात ठाकरे गटाची ताकद फारशी उरलेली नाही. बाबर गटाचेच तीन सदस्य जिल्हा परिषदेत होते. खा. राऊत यांनी पुढचा आमदार शिवसेनेचाच असे विधान विटा येथे केले असले तरी या ठिकाणी खरी लढत आहे ती बाबर विरूध्द माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटामध्येच. या गटाचे वैभव पाटील हे मैदानात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

हेही वाचा >>> वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता

राऊत यांच्या स्वागतासाठी ते उपस्थित होते. महाविकास आघाडीचे नेते या नात्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते हजर होते. मात्र राऊत यांनी खानापूरचा पुढचा आमदार ठाकरे गटाचा होईल अशी गर्जना केल्याने पाटील यांची कोंडी होणे स्वाभाविकच मानले जात आहे. कारण त्यांनी या गटाची उमेदवारी घेऊन मैदानात उतरण्याची तयारी केली तर त्यांना भाजपअंतर्गत गटाकडून मिळणारी कुमक गमावण्याचा धोका आहे. एकूणच शिवसेनेतील फुटीनंतर आता संघर्ष वाढणार आहे.

राऊत यांच्या टीकेचा आ. बाबर यांनी जोरदार समाचार घेतला. गर्दी झाली म्हणजे मते मिळतातच असे नाही, असा टोला लगावला. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील टोकदार संघर्ष पाहण्यास मिळेल असे वाटते. याला बाबर विरोधकांची ताकद तर मिळणार आहेच, पण भाजपचे नेतृत्व काय भूमिका घेते हेही महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 17:59 IST