आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : दिल्लीहून परतताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला… खासदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जावयासह लेकीवर घोटाळ्याचे आरोप केले… भाजपाने राजकीय खेळी करत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिंदे गटाला दूर ठेवले… देवेंद्र फडणवीस यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृहखात्याचा त्याग करायला हवा, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली… मुंबई महानगरपालिकेत भाजपा-शिंदे गटाच्या युतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून मंगळवारी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. त्यांनी अचानक केलेल्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यादरम्यान दिल्ली दौऱ्याहून परतताच शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. अकोला महापालिकेतील ठाकरे गटाच्या ८ पैकी ४ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून त्या संदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. उबाठा गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यासह अकोला महानगरपालिकेतील नगरसेवक मनोज पाटील, सागर भरूका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे यांनी हाती भगवा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मंत्र्याच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलीसह जावयावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील चार हजार एकर जमीन ZR2 या कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. मंत्री विखे यांचे जावई अजित ढोकणे त्या कंपनीचे संचालक होते. ही जमीन खाजगी कंपनीला देण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय लंके यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच ZR2 कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात १०० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा लंके यांनी केला आहे. हा पैसा हवाला मार्गाने आला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा : भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्याची तयारी? शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
भाजपाने शिंदे गटाला ठेवले सत्तेबाहेर
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे सूत्र ठरल्यानंतरही भाजपाने राजकीय खेळी करत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिंदे गटाला दूर ठेवले. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे यांनी सत्तेची नवी गणिते घालण्याच्या प्रयत्नांना भाजपाने खिळ घातली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीभोवती रंगलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीत अध्यक्षपदी भाजपाचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध झाली. शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतदानात सहभाग नोंदवला नाही. विशेष बाब म्हणजे- भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, ऐनवेळी भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेत एकहाती सत्तास्थापन केली.
संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
अहिल्यानगर येथील घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृहखाते सोडले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. अहिल्यानगरमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीवर अॅसिड फेकल्याची घटना घडली. या घटनेवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की- अहिल्यानगरमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर अॅसिड फेकलं गेले आहे; पण देवेंद्र फडणवीस हे सांगू शकतात की असे काहीही घडले नाही. सरकार सक्षम आहे, गृहखात्याचं लक्ष आहे. आमच्या राज्यात महिला आणि मुली सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. ज्या मुलीवर अॅसिड फेकले गेले ती मुलगी नाही तर निर्जीव बाहुली होती, असे उत्तर विधानसभेत मिळू शकते असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा : काँग्रेसचा प्रभावशाली नेता भाजपाच्या वाटेवर? विद्यमान खासदाराने राजीनामा का दिला? कारण काय?
मुंबई महापालिकेत महायुतीत वादाची ठिणगी
मुंबई महानगरपालिकेत भाजपा-शिंदे गटाच्या युतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दोन्ही पक्षात अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली. महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना डावलून नियमांचा भंग केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. या प्रकरणावरून शिंदे सेनेचे गटनेते अमेय घोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली. उपमहापौर हे मानाचे पद असून त्यांना डावलणे हा केवळ व्यक्तीचा नाही, तर त्या पदाचा अवमान आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाने प्रोटोकॉलमध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही आसनव्यवस्था ठरवली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे अमेय घोले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
