आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना ठाकरे गटातील जळगावातील एक प्रभावी नेता शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याची टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी केली… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना धमकी देणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे एकच खळबळ उडाली.. वन खात्याकडे पैशाची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाड तोडून त्यातून पैसे कमावले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला… भाजपाचे धर्माच्या आधारावरील विभाजनाचे राजकारण हाणून पाडा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंचा शिलेदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?
महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा गुलाल फिका पडताच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचा एक प्रभावी नेता शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या शुक्रवारी हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संबंधित नेत्याच्या नावाबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. ग्रामीण भागात पक्षाची पकड सैल होत चालली असून तर शहरी मतदारसंघांमध्येही पक्षाची ताकद घटल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्याने आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करत शिंदे गटाशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमोल मिटकरींमुळे राष्ट्रवादीच अडचणीत?
आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याची टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी केली. मिटकरी यांनी पक्षातील नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम केले. याचा गैरफायदा विरोधक घेत असल्याचा आरोपही भरगड यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले आहे. या सर्व मुद्द्यावरून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी अमोल मिटकरी यांना लक्ष्य केले आहे. अमोल मिटकरी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आणखी वाचा : इराणच्या खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात राजकीय वादंग का उठला? कारण काय?
मनोज जरांगे पाटील यांना उघड धमकी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना धमकी देणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे एकच खळबळ उडाली. “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास… भंडारा लावून बोलतोय” अशा आशयाचा मजकूर या पोस्टमध्ये नमूद आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी समाजमाध्यमांवर ही पोस्ट केल्याचा आरोप मराठा तरुणांकडून केला जात आहे. या पोस्टमधून भाजपाचे आमदार सुरेश धस यांनादेखील धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. विविध आंदोलनांदरम्यान नेतेमंडळींवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने मोछी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून सध्या जरांगे व मुंडे समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.
श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर आरोप
राज्याच्या वनविभागात काय काय प्रकार चालू आहेत बऱ्याच गोष्टी कानावर आल्या आहेत. आम्ही त्याबाबत जास्त काही बोलत नाही. वनविभागाकडे पैशांची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाडं तोडून त्यांची विक्री करणार आणि त्यातून पैसे कमावणार आहेत. याबाबत माहिती घेणे देखील गरजेचे आहे, असा गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांच्या आरोपामुळे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बिबट्या शहरात येऊ नये म्हणून जंगलात शेळ्या सोडणार होतात. आता म्हणतात की आम्ही फळझाडे लावू. बिबट्या हे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे पहिले माहिती करून घ्यावे मग वनखात्याचा कारभार करावा, असा टोला देखील खासदार शिंदे यांनी नाईक यांना लगावला. नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेच्या नगरसेवकांचा अभिनंदन मेळावा पार पडला. यावेळी खासदार शिंदे बोलत होते.
रमेश चेन्नीथला यांची भाजपावर टीका
भाजपाचे धर्माच्या आधारावरील विभाजनाचे राजकारण हाणून पाडा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे; पण भाजपाने मागील १२ वर्षापासून देशात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण केले आहे, असेही ते म्हणाले. कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना निवडणुकीत जय पराजय होत असतात, पराभवाने खचून न जाता काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या आणि आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करा, असे आवाहन चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले.
