Thalapathy Vijay TVK party: अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या थलपती विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) हा तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांना मिळालेल्या यशाने राजकीय वर्तुळात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूतील सर्वच २३४ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी १०८ जागांवर टीव्हीकेला विजय मिळाला आहे. तमिळनाडूच्या राजकारणात विजय ‘गेम चेंजर’ ठरले. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीला असलेल्या अभिनेत्यांपैकी विजय एक आहेत. तमिळनाडूत त्यांच्या फॅन व समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. प्रचारात एकदा विजय म्हणाले होते, “सर्वच २३४ जागांवर विजयच उमेदवार आहे.”

तमिळनाडूच्या राजकारणात विजय यांना यश मिळाले आहे. राजकारणात प्रवेश करण्याआधी विजय यांनी अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. सहा वर्षांपूर्वी विजय यांच्या पालकांनी त्यांना राजकीय क्षेत्रात पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा विजय यांनी आई – वडिलांविरोधात खटला दाखल केला होता. परंतु, २०२४ मध्ये थलपती विजय यांनी अधिकृतपणे त्यांच्या पक्षाची घोषणा केली. तमिळनाडूच्या राजकारणात एक नवा पक्ष दाखल झाला.

थलपती विजय यांची ‘फॅन्डम पावर’

थलपती विजय यांनी अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून सुरूवात केली होती. १९८४ साली विजय यांचे वडिल एस.ए. चंद्रशेखर यांनी व्हेत्री हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. याच चित्रपटात विजय यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.

विजय यांच्या वडिलांनी त्यानंतर सेंथूरापंडी (१९९३) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात विजय यांनी प्रसिद्ध अभिनेता विजयकांत यांच्याबरोबर काम केले होते. या चित्रपटाने विजय हे प्रकाशझोतात आले. रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपटात विजय दिसू लागले, तसेच त्यानंतर ते अॅक्शन व मास सिनेमात दिसले. त्यामुळे त्यांना कालांतराने ‘थलपती’ (कमांडर) अशी उपाधी त्यांच्या चाहत्यांनी दिली.

विजय यांच्या नावाने फॅन क्लब्ज आणि समाजसेवा

दाक्षिणात्य चित्रपटांतील काही मोजक्या अभिनेत्यांना त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते, तसेच प्रेम विजय यांनाही मिळत गेले. विजय यांच्या चाहत्यांनी शहरी तसेच ग्रामीण भागात फॅन क्लब्ज सुरू केले. त्याअंतर्गत कार्यालये (ऑफिसेस) सुरू करण्यात आली. चाहत्यांकडून विजय यांच्या नावाने समाज कार्य होत होते. रक्तदान शिबीरे आयोजित केली जात होती. ‘ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयाख्खम’ या नावाखाली विजयचे चाहते काम करत होते.

थलपती विजय यांनी चाहत्यांकडून मिळत असलेल्या या समर्थनाचे रूपांतर राजकीय फायद्यात करणे ही एक सामान्य बाब होती. कारण तमिळनाडूत या आधी अनेक अभिनेत्यांनी याच प्रकारे राजकारणात प्रवेश केला होता. परंतु, थलपती विजय यांच्या मनात राजकारणात प्रवेश करण्याबाबत साशंकता होती.

राजकारणात प्रवेश करण्याआधी थलपती विजय यांना कोणती भीती?

२०२३ मध्ये थलपती विजय पक्ष स्थापन करणार असल्याची अफवा असताना सिनेक्षेत्रातील एका सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “विजय यांच्या फॅन ग्रुपची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी विजय यांच्या राजकीय पदार्पणाची तयारी केली होती. परंतु, विजय यांच्या मनात त्यावेळी राजकारणातील करिअर बाबत शंका व अनिश्चितता होती. तमिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण होत नाही, तोपर्यंत राजकारणात जाण्याचा विचार नाही, असे ते आम्हाला खासगीत म्हणाले होते. आता मध्ये ते स्थानिक पातळीवर काम करत आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व एआयएडीएमकेचे नेते एडापद्दी के पलानीस्वामी यांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची ही सुरूवात असावी.” असे २०२३ मध्ये एका सूत्राने सांगितले होते.

सहा वर्षांपूर्वी विजय यांनी आई – वडिलांवर दाखल केला होता खटला?

तमिळनाडूत थलपती विजय यांची प्रतिमा एका लाजाळू आणि खासगी जीवन जगणाऱ्या अभिनेत्याची आहे. ते जनतेशी मर्यादीत संवाद साधतात. विजय यांच्या राजकीय प्रवेशात त्यांचे वडील एस ए चंद्रशेखर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. चित्रपटातील एखाद्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटल्यास थलपती विजय हे शांत राहणे पसंत करतात. तर त्यांचे वडील वादावर प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देतात. २०२० मध्ये एस. ए. चंद्रशेखर यांनी विजय यांच्या विजय मक्कल इयाख्खम (व्हीएमआय) या संस्थेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी विजयची परवानगी घेतली नव्हती. त्यांनी स्वत:चे नाव पक्षाचे सरचिटणीस, तर त्यांच्या पत्नी व विजय यांच्या आई गायिका शोभा यांचे नाव पक्षाच्या कोषाध्यक्ष म्हणून दिले होते.

विजय यांच्या अभिनय क्षेत्रातील सुरूवातीच्या काळात फॅन क्लब्जची स्थापना आपणच केली होती, तसेच त्यावेळीही विजयची परवानगी घेतली नव्हती. पक्ष स्थापन करणे ही माझी भूमिका होती, त्याच्याशी विजयचा काहीही संबंध नव्हता, असे थलपती विजय यांचे वडील म्हणाले होते, तर राजकारणात कधी उतरायचे याबाबत विजयच निर्णय घेईल, असे विजयच्या आई म्हणाल्या होत्या. सप्टेंबर २०२१ मध्ये विजयने व्हीएमआय आणि त्याच्या पालकांसह इतर ११ जणांविरोधात खटला दाखल केला होता. त्यानंतर व्हीएमआय पक्ष विसर्जित करण्यात आला होता. त्यानंतर एका वर्षाने विजय यांच्या संस्थेतील फॅन्सने स्थानिक निवडणुका लढवल्या होत्या. १६९ पैकी ११५ जागांवर विजय यांचे फॅन्स निवडून आले होते.

विजय यांची प्रचारादरम्यान भाजपा – डीएमकेवर टीका

तमिळनाडूच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाच्या प्रवेशासाठी पोकळी निर्माण झालेली असतानाच टीव्हीके पक्ष दाखल झाला. २०१६ मध्ये एआयएडीएमकेच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर एआयएडीएमके मध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. त्यामुळे पक्ष मागे पडला. विजय यांनी प्रचारादरम्यान डीएमकेवर भ्रष्टाचाराची तर भाजपाच्या विचारधारेवर टीका केली. तरूणाई व महिलांची मते विजय यांना मिळाली.