ठाणे : शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (बाळू पूर्णेकर) यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आता ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजात उमटू लागले आहेत. या हत्येला महिना उलटला तरीही तपास यंत्रणांना या प्रकरणाचा पुर्ण छडा लावता आलेला नाही. पुर्णेकर कुटुंबियांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी या प्रकरणी आंदोलनाची भूमिका घेतली असतानाच ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आगरी-कोळी समाजातील विवीध संघटना, नेते, पदाधिकारी यांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. पुर्णेकर हे आगरी समाजातून येतात. त्यामुळे ठाण्यात सुरु असलेले मोर्च्यांना आता समाजातील एका मोठया गटाची साथ मिळू लागल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयात निर्घृण हत्या करण्यात आली होती. पाच जणांनी कार्यालयात शिरून दोन बंदुकांनी गोळ्या झाडल्या, तसेच चॉपरने वार केले होते. या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांकडून शिंदे गटाच्या विद्यमान नगरसेविका माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी शिंदे दाम्पत्यांची चौकशी सुरु केली. त्याविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरुन ठाणे शहरात रस्ता रोको, कॅण्डल मार्च, पोलिस ठाण्यांवर ठिय्या अशास्वरुपाची आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांना आता आगरी-कोळी संघटना आणि समाजाची मोठी साथ मिळू लागल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे.
पुर्णेकरांना साथ, गावोगावी बैठका
प्रदीप पूर्णेकर हे आगरी समाजातून येत. त्यांचे चुलत बंधू बाळाकृष्ण पुर्णेकर हे काॅग्रेसचे ठाण्यातील बडे नेते होते. ठाणे जिल्ह्यातील प्रभावी आगरी नेत्यांमध्ये त्यांची ओळख होती. बाळाकृष्ण यांच्या अपघाती निधनानंतरही पुर्णेकर कुटुंबियांचा प्रभाव चितळसर, मानपाडा भागात अनेक वर्ष टिकून होता. पुर्णेकर यांचे मूळ गाव ठाण्यातील कोलशेत आहे. महिना झाला तरी या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. गावोगावी सुरु झालेल्या बैठकांमधून ही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. समाज माध्यमामधूनही आगरी समाजातील काही तरुण उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
ठाणे शहरातील गायमुख, ओवळा, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, कोलशेत, ढोकाळी, बाळकूम, माजिवडा, कळवा, खारेगाव, विटावा आणि कोपरी या आगरी-कोळीबहुल गावांमध्ये पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा निघू लागले आहेत. या मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, अन्य समाजातील नागरिकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यापाठोपाठ भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही समाजाची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भिवंडी तालुक्यात आगरी-कोळी समाजाची २५० हून अधिक गावे असून, यातील काही गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्याची भूमिका समाजातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील आगरी-कोळी समाजाला एकत्र आणण्यासाठी सागरी भूमिपुत्र महासंघाची प्राथमिक बैठक सोमवारी रात्री डोंबिवलीतील निळजे गावात पार पडली. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळत नसल्याची भावना राजकीय वर्तुळातही तीव्र होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेते, कार्यकर्ते दबक्या सुरात याविषयी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. ठाणे पोलिसांना आतापर्यत ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे सांगता आलेले नाही. त्यामुळे ही नाराजी आणखी वाढत आहे.
घोडबंदर भागात आम्ही मेणबत्ती मार्चचे आयोजन केले होते. येत्या काही दिवसांत मुंबई, नवी मुंबईसह विविध शहरांमध्येही मेणबत्ती मार्च काढण्यात येणार आहेत. दिवाळीच्या काळात समाजमाध्यमांवर ‘एक दिवा बाळू दादासाठी, एक दिवा न्यायासाठी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत कारवाई झाली नाही, तर शहरात मोठे आंदोलन उभारण्याचे नियोजन आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकारीही पूर्णेकर कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याची भूमिका मांडत असून, त्यांचाही पडद्याआडून पाठिंबा मिळत आहे. – सागर पाटील, मुख्य समन्वयक, सागरी भूमिपुत्र महासंघ.
पूर्णेकर यांची हत्या दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या प्रकरणाची माहिती रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली. त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.- दीपेश म्हात्रे, नगरसेवक, भाजप.
