ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्र आणि त्यांच्या समर्थकांचा गेल्या काही काळापासून एकहाती प्रभाव पहायला मिळत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना उमेदवारांच्या निवडीपासून जागांच्या वाटपात भाजप अग्रेसर राहील याची काळजी पक्षाने घेतल्याचे पहायला मिळत आहे. उल्हासनगरात कुमार आयलानी यांचा अपवाद वगळला तर पक्षाने जिल्ह्यातील सात आमदारांना पुन्हा उमेदवारी देत असतानाच मिरा-भाईदरच्या अपक्ष आमदार गीता जैन स्वगृही कशा परततील यादृष्टीने मोर्चेबांधणी केल्याने जिल्ह्यातील १८ पैकी नऊ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात असतील असे चित्र आता दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, कल्याण पुर्व, ठाणे, मुरबाड, ऐरोली या मतदारसंघात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही भाजपने आपल्याला हवे तेच उमेदवार रिंगणात उतरवून यामध्येही शिंदेसेनेचा फारसा विचार केलेला नाही.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने आठ तर तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेने पाच जागांवर विजय मिळवला होता. मिरा-भाईदरच्या जागेवर भाजपच्या तत्कालिन महापौर गीता जैन या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यावर भाजपचा दबदबा अधोरेखीत झाला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येताच तेव्हाचे नगरविकास आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मागील पाच वर्षात जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळावर एकहाती वर्चस्व निर्माण केल्याचे दिसून आले. भाजपचे आमदार अधिक असूनही ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मिरा-भाईदर यासारख्या शहरांमध्ये शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांची चलती दिसून आली. शिंदे पिता-पुत्र संपूर्ण जिल्ह्यावर वरचष्मा मिळवत असताना भाजपचे जिल्ह्यातील एकमेव मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील या काळात जिल्ह्यातील राजकीय पटलावर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात आपल्याला कुणी विचारत नाही अशी भावना भाजपच्या स्थानिक नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांमध्ये होती. कल्याण, नवी मुंबई, ठाणे, मुरबाड यासारख्या शहरात भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष टोकाला पोहचल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नेमकी कोणती भूमीका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा : बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यांदा उमेदवारी

जुन्या आमदारांवर विश्वास, शिवसेनेच्या विरोधाला वाकुल्या

उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचा एकमेव अपवाद वगळला तर भाजपने आपल्या पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यातील सात आमदारांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. मिरा-भाईदर या हक्काच्या मतदारसंघात भाजपमध्ये नरेंद्र मेहता आणि अपक्ष आमदार गीता जैन यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षाचा फायदा शिंदेसेनेला मिळेल असे वाटत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना आपल्या शासकीय बंगल्यावर बोलावून घेतले. जैन यांनी भाजपमधूनच लढावे यासाठी त्यांच्यापुढे आग्रह धरला आणि नरेंद्र मेहता यांची समजूत घातली गेल्याचे वृत्त आहे. हे करत असताना शिंदेसेनेतील स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही भाजपने ठाण्यात संजय केळकर आणि कल्याण पुर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. शिवसेनेच्या (शिंदे) शहरप्रमुखावर गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड अजूनही कारागृहात आहेत. असे असताना शिंदे यांच्या पक्षाचा विरोध डावलून सुलभा यांना उमेदवारी देताना भाजपने ‘आम्ही ठरवू तोच उमेदवार’ या न्यायाने मार्गक्रमण केल्याचे पहायला मिळत आहे. नवी मुंबईत मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय दररोज गणेश नाईक यांच्याविरोधात खडे फोडताना दिसतात. त्यानंतरही भाजपने नाईक यांना रिंगणात उतरविताना स्थानिक विरोधाकडे कानाडोळा केला आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांच्याविरोधात माजी खासदार कपील पाटील यांच्यासह शिंदेसेनेतील शिलेदारही आक्रमक झाले होते. मात्र कथोरे यांच्यामागे पक्षाने ठामपणे उभे रहाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?

मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला कमी जागा ?

ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईदरची एक जागा धरुन भाजप एकूण नऊ जागा लढविण्याच्या तयारीत असून कळवा-मुंब्रा, भिवंडी पुर्व आणि शहापूरच्या जागेवर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. असे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाट्याला जेमतेम सहा जागा येतील असे चित्र आहे. त्यातही कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील यांच्या विरोधात पक्षाला उमेदवार द्यावा लागणार असल्याने तेथील स्थानिक भाजप नेत्यांचे बळ कुणामागे एकवटेल याची चिंताही शिंदेसेनेला वाटू लागली आहे.

Story img Loader