ठाणे – ठाणे शहरात घराबाहेर पडायचे, तर आधी रस्ता मोकळा आहे ना, हे तपासावे लागते. कारण, राजकीय संघर्षामुळे कधीही रस्ते अडवले जाऊ शकतात, या भीतीने ठाणेकरांच्या मनात धडकी भरली आहे. कधी कुठे मोर्चा निघेल, कुठे अचानक रास्ता रोको होईल आणि कुठे वाहतूक कोंडीत अडकावे लागेल, याचा नेम राहिलेला नाही.

शिवसेना (ठाकरे ) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षाचा फटका आता थेट ठाणेकरांना बसू लागला आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांतून निर्माण होणारी आंदोलने यात सामान्य नागरिक भरडले जात आहेत. कामावर जाणारे, शाळेत जाणारी मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मोर्चा आहे का, रस्ता बंद आहे का, याची चौकशी करण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.

ठाण्यात आधीच वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहेत. शहरात मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, आनंदनगर-साकेत उन्नत मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग आणि घोडबंदर मुख्य व सेवा रस्त्यांना जोडणाऱ्या प्रकल्पांची कामे एकाच वेळी सुरू असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यात आता राजकीय संघर्षामुळे कोंडीत भर पडत आहे. कुठे मोर्चा, कुठे रास्ता रोको, तर कुठे रस्ते अडवले जात असल्याने नागरिकांना तासन्‌तास कोंडीत अडकावे लागत आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधीच कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांच्या मनात आता राजकीय आंदोलनांच्या धास्तीनेही धडकी भरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे. आंदोलनाची घोषणा झाली की वाहतूक कोंडीची चिंता, रास्ता रोको झाला की पर्यायी रस्त्यांचा शोध आणि मोर्चा निघणार असल्याची माहिती मिळाली की घराबाहेर पडायचे की नाही, याचा विचार ठाणेकरांच्या मनात सुरू होतो. सकाळी कामावर जाताना वाहतूक कोंडीचे व्हॉट्सॲपवरील संदेश तपासायचे आणि संध्याकाळी घरी परतताना रस्ते मोकळे आहेत का, यासाठी पुन्हा मित्रमंडळी आणि नातेवाईकांना फोनाफोनी करायची, हे आता ठाणेकरांसाठी नित्याचे झाले आहे. राजकीय संघर्षामुळे ठाणेकरांच्या रोजच्या जगण्यावरच परिणाम होऊ लागला आहे.

हत्येच्या प्रकरणाला राजकीय वळण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या हत्येत शिंदे सेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात पोलिसांना पुरावे दिले असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून वारंवार होत आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दिवशी कुटुंबियांची हेच आरोप करत कापुरबावडी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. पण, पुरावे देऊनही २९ दिवसानंतरही कारवाई होत नसल्याने समर्थक आक्रमक होताना दिसून येत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यातच पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप झाल्याने या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत आहे. आता या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, त्याचे पडसाद आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यांवर उमटू लागले आहेत.

जमाव आक्रमक का बनला?

प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी वडिलांच्या हत्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रिक्षात डांबून थेट नौपाडा पोलीस ठाण्यात आणले. वडिलांच्या हत्या प्रकरणात पुरावे देऊनही संबंधितांवर कारवाई होत नाही आणि न्यायासाठी दाद मागायला जात असताना पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले, अशी समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. या घटनेचे पडसाद उमटत आगरी समाजातील नागरिकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट नौपाडा पोलीस ठाणे गाठत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे नौपाडा परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान आंदोलन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

रस्ते अडवले, नागरिक अडकले

पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी कारवाईची मागणी करत समर्थकांनी रास्ता रोको केला. नौपाड्यातील गोखले रस्त्यासह परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला. प्रमुख मार्गांवरील वाहतूक थांबल्याने वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा आधार घेतला. मात्र, तिथेही वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांची कोंडी झाली. दिवसभर हा प्रकार सुरू होता. यानंतर रात्री मानपाडा परिसरातही आंदोलनाचे पडसाद उमटले. घोडबंदर मार्गावरील मानपाडा उड्डाणपुलावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. घोडबंदरला जोडणारे काही अंतर्गत रस्तेही अडवण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू होता. या कोंडीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अडकून पडल्या होत्या. काही नागरिकांना पाच-पाच तास कोंडीत अडकून राहावे लागले. वाहनांच्या रांगा वाढत असताना कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसल्याने अनेकांनी अखेर गाड्या सोडून पायी जाण्याचा निर्णय घेतला. वाहनांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती असल्याने त्यांची गैरसोय अधिकच वाढली. एका बाजूला आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम होते, तर दुसऱ्या बाजूला कोंडीत अडकलेल्या नागरिकांना घरी कसे पोहोचायचे, याची चिंता सतावत होती. रात्री १ वाजेपर्यंत पोलीसही रस्त्यावर नव्हते. नागरिक हतबल झाले होते. रात्री २ वाजता पोलिसांची कुमक दाखल होण्यास सुरुवात झाली. ३ वाजता पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव हटवून रस्ता मोकळा केला. यानंतर वाहतूक सुरू झाली. या आंदोलनांनंतरच ठाणेकरांच्या मनात धडकी भरली. या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे दुसऱ्या दिवशी शिंदेंची सेना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्याने ठाणेकर पुन्हा कोंडीत अडकले.

नरेश म्हस्केंचे आव्हान, ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

या हत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. पूर्णेकर समर्थकांनी रास्ता रोको केल्यानंतर बुधवारी शिंदे सेनेचे पदाधिकारी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे नौपाडा परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आणि गोखले रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यात येऊन पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना ठाण्यात येण्याचे आव्हान दिले. एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलल्यास ठाण्यातून परत जाणार नाहीत, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. असे असले तरी शिंदे सेना आणि उबाठा असे दोन्ही समर्थक शहरात गुरुवारी मोठ्या संख्येने जमल्यामुळे शहरात पुन्हा कोंडी होऊन त्याचा फटका ठाणेकरांना बसला. एकूणच राजकीय नेत्यांमधील या आव्हान-प्रतिआव्हानांचा परिणाम रस्त्यांवर दिसू लागला. कोणता नेता ठाण्यात येणार, कोण मोर्चा काढणार आणि त्याला कोण प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. मात्र, या संघर्षात वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचे काय, हा प्रश्न मागे पडत आहे. राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या या वातावरणात नागरिकांच्या हालांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली.

घराबाहेर पडायचे की नाही?

ठाण्यातील या घटनांमुळे नागरिकांना आता व्हॉट्सॲपवरील संदेशांवर लक्ष ठेवावे लागत आहे. कोणत्या भागात मोर्चा आहे, कोणता रस्ता बंद होऊ शकतो, वाहतूक कुठे वळवली आहे, याची माहिती घेतल्याशिवाय अनेक जण घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. काहींनी संभाव्य कोंडी टाळण्यासाठी प्रवास पुढे ढकलण्याचा पर्यायही स्वीकारला आहे. सकाळी कामावर जाताना रस्ते मोकळे आहेत का, याची चौकशी करायची. संध्याकाळी घरी परतताना पुन्हा फोन करून वाहतुकीची स्थिती विचारायची. रस्ता बंद असल्यास दुसरा मार्ग शोधायचा. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, कामाचे नियोजन बिघडते आणि नोकरी करणाऱ्या महिलांचे घरातील वेळापत्रकही कोलमडते. या परिस्थितीचा परिणाम आता पालकांच्या चिंतेतूनही दिसू लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असो किंवा घोडबंदर परिसरात, अचानक रास्ता रोको झाला तर मुलांना शाळेतून घरी आणताना अडकून पडावे लागेल का, अशी भीती पालकांना वाटते. रुग्णालयात जायचे असेल, एखाद्या नातेवाइकाच्या कार्यक्रमाला पोहोचायचे असेल किंवा कामावरून वेळेत घरी परतायचे असेल, तरी रस्त्यांवरील परिस्थितीचा आधी अंदाज घ्यावा लागत आहे. ठाण्यात आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात राजकीय आंदोलनांची भर पडल्याने एका रस्त्यावरील कोंडीचा परिणाम दुसऱ्या रस्त्यावरही होतो. परिणामी, आंदोलनाच्या ठिकाणापासून दूर असलेल्या नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

कायदा-सुव्यवस्थेचे पोलिसांपुढे आव्हान

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या आरोपांची सत्यता तपासणे आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, याची काळजी घेणेही आवश्यक आहे. पुरावे देऊनही कारवाई होत नाही, अशी भावना पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये का निर्माण होते, याचाही विचार पोलिसांनी करणे गरजेचे आहे. यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोर्चे आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कुमक सज्ज ठेवण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी पूर्वनियोजन केले जात असे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या नियोजनावर आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका हत्या प्रकरणावरून शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असेल आणि त्याचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना बसत असेल, तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे संभाव्य आंदोलनांची पूर्वकल्पना घेणे, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी हस्तक्षेप करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे, यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी नियोजन करणे गरजेचे आहे.

राजकीय संघर्षात ठाणेकरांचा काय दोष?

ठाण्यात आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात राजकीय आंदोलनांची भर पडल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. कामावर वेळेत पोहोचणे, मुलांना शाळेतून आणणे, रुग्णालयात जाणे किंवा रात्री घरी परतणे यासारख्या साध्या गोष्टीही अनिश्चित बनल्या आहेत. नेत्यांच्या राजकीय भूमिकांवर मतभेद असू शकतात. आंदोलन, मोर्चे आणि निषेध हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या हालांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रस्ते अडवले गेल्यानंतर वाहतुकीचे नियोजन कोण करणार, कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मदत कोण पुरवणार आणि रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांसाठी मार्ग मोकळा कोण ठेवणार, याची स्पष्ट जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि आव्हान-प्रतिआव्हान सुरू राहतील. परंतु त्यासाठी ठाणेकरांचा वेळ, सुरक्षितता आणि दैनंदिन जीवन पणाला लागता कामा नये. राजकीय संघर्ष रस्त्यावर उतरण्यापूर्वीच पोलिसांनी आणि प्रशासनाने परिस्थितीचा अंदाज घेऊन हस्तक्षेप करणे, संभाव्य तणाव रोखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. हत्या प्रकरणाचा तपास आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था या दोन्ही आघाड्यांवर प्रशासनाने जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे. दुर्देवाने ते होताना दिसून येत आहे. त्यामुळेच राजकीय संघर्षात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाणार नाही, याची खात्री देण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनाची आहे.