आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एक जाहीर विधान सध्या राजकीय चर्चेचे कारण ठरत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पदांची अदलाबदल केली. सरमा यांनी अमित शाह यांचा उल्लेख देशाचे पंतप्रधान म्हणून तर नरेंद्र मोदी यांचा उल्लेख देशाचे गृहमंत्री असा केला. भाजपानं ही एक मानवी चूक असल्याचे म्हटले आहे, तर विरोधकांनी अमित शाह यांना भाजपा आता पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की काय घडले?

आसाम सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात मुख्यमंत्री सरमा बोलत होते. बोलताना हिमंता सरमा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पदांची अदलाबदल केली. आपल्या भाषणादरम्यान सरमा यांनी “पंतप्रधान अमित शाह, आमचे लाडके गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानतो”, असा उल्लेख केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: उपस्थित होते. हा सर्व प्रकार अमित शाह यांच्या समक्षच घडला.

कॉंग्रेसनं घेतली आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री सरमा यांच्या भाषणातील हा १५ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विरोधकांनी ही चूक नसून अमित शाह यांना पुढील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याचा भाजपाचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे. आसाम कॉंग्रेसने ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत यापूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये कॉग्रेसने म्हटले आहे की जेव्हा सरबानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री होते तेव्हा खासदार पल्लबलोचन दास यांनी जाहीरपणे हिमंता सरमा यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला होता. यावरून भाजपाने अमित शाह यांचा पुढचे पंतप्रधान म्हणून प्रचार सुरू केला आहे का? असा सावाल विचारला आहे. आसाम जातीय परिषदेनं देखील हा भाजपाचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

सरमा यांनी अमित शाह यांचा पंतप्रधान म्हणून केलेला उल्लेख ही एक चूक नसून तो भाजपाच्या रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे. तर ही फक्त एक बोलताना झालेली चूक आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनासुद्धा या गोष्टीचा राग आलेला नसल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.