गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात पेटलेला वाद अद्याप शमलेला नाही. वडेट्टीवार यांनी प्रचारदरम्यान आत्राम यांना एकेरी भाषेत डिवचल्याने दोघात शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यात आत्राम यांनी वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असा दावा केला. त्यामुळे वाद अधिकच चिघळला.

काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून महायुतीत सामील झाला. राष्ट्रवादीचे गडचिरोली येथील वरिष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे आत्राम यांची राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, लोकसभेसाठी असलेली इच्छा आत्राम यांनी वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवली हाती. त्यामुळेच गडचिरोली-चिमूरसाठी भाजपने शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करत विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा संधी दिली. लोकसभेत संधी न मिळाल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम नाराज होतील. असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र, झाले उलट. लोकसभा निवडणुकीच्या प्राचारात अशोक नेते यांच्यासाठी सर्वाधिक सभा आणि बैठका घेऊन आत्राम यांनी भाजपा नेत्यांनाही मागे टाकले. तर काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकहाती खिंड लढवली. यादरम्यान वडेट्टीवार यांच्या टिकात्मक शब्दांनी आत्राम दुखावले व त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधूमीत वडेट्टीवार ४ जूननंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा केला. यामुळे काँग्रेसच्या गोटात वादळ उठले. तर भाजपचे नेतेही बुचकळ्यात सापडले. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घेतलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल मौन बाळगले. इतकेच नव्हे तर भाजपचे नेतेही संपूर्ण प्राचारदरम्यान शांतच होते.

हेही वाचा… ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित

भाजपामध्ये कोण जाणार?

लोकसभेसाठी डावलल्याने ऐन निवडणुकीत काँग्रेसचे तीन नेते भाजपामध्ये गेले. महायुतीकडून इच्छुक धर्मरावबाबा आत्राम यांचीही संधी हुकली. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना आणि त्यांच्या मुलीसाठी भाजपकडून शब्द दिला गेला, अशी माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी वडेट्टीवार यांची चर्चा असली तरी येत्या काही दिवसात आणखी काही नेत्यांचा भाजप प्रवेशाची शक्यता नाकारता येत नाही.