पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात विधानसभेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढाईत भाजपाचा पराभव झाला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पश्चिम बंगाल भाजपामध्ये पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. पक्षात नाराज असलेल्या नेत्यांकडून नवीन राज्य बनवण्याच्या मागण्यांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती पक्षाचे बिष्णुपूरचे खासदार सौमित्र खान यांच्याकडून मिळाली आहे. सौमित्र खान यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या जंगलमहाल क्षेत्रात बांकुरा, पुरुलिया, पश्चिमी मेदिनिपुर आणि झारग्राम जिल्ह्यांचा समावेश करून राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. 

वेगळ्या राज्याची मागणी

बांकुरा हा सौमित्र खान यांचा मतदार संघ आहे. पक्षाच्या जिल्हा मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना खान म्हणाले की “बिरभूम आणि पश्चिम वर्धमान जिल्ह्याचा आसनोल उपविभाग देखील या वेगळया राज्यात समाविष्ट केला पाहिजे.” एकेकाळी माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या प्रदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत खान यांनी तृणमूल काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते की राज्य सरकारला राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढवायची आहे. सौमित्र खान म्हणाले की जर सरकारची ही भूमिका असेल तर आमची मागणी रास्त आहे असेच म्हणावे लागेल. कारण राज्य सरकारने या भागातील लोकांना प्रत्येक बाबतीत वंचित ठेवले आहे. या भागाचा आणि भागातील लोकांचा कुठलाही विकास झालेला नाही. येथील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. जर वेगळे राज्य बनवण्यात आले तर या लोकांना योग्य तो न्याय मिळेल. 

भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये ‘स्वगृही’ परतणाऱ्यांची संख्या वाढली

यापूर्वीसुद्धा करण्यात आली होती मागणी

खान यांनी केलेली वेगळ्या राज्याची मागणी ही काही पहिल्यांदा झालेली मागणी नाही. यापूर्वी देखील अन्य नेत्यांनी पश्चिम बंगालच्या विभाजनाची मागणी केली होती. अलीपुरदूअरचे खासदार जॉन बाराला यांनी उत्तर बंगालला स्वतंत्र राज्य बनवण्याची किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली होती. आमदार बिष्णुप्रसाद शर्मा यांनी दार्जिलिंग हिल्स पश्चिम बंगालपासून वेगळे करण्याची मागणी केली होती.

तृणमूल काँग्रेसची भूमिका

पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता अश्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी आणि सतत लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी भाजपा हे करत असल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “भाजपा राज्यभर फुटीरतावादाला खतपाणी घालत आहे आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी पश्चिम बंगालच्या विभाजनाचा कट रचत आहे. आम्ही तसे कधीच होऊ देणार नाही”, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाचे जेष्ठ आमदार तपास रॉय यांनी दिली आहे.