नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. बहुचर्चित भोकर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांच्यासह १४ जणांनी उमेदवारी मागितली असून देगलूर (राखीव),नांदेड (उत्तर) आणि मुखेड मतदारसंघातही मोठी चुरस आहे.

काँग्रेस पक्षाने गेल्या महिन्यापासूनच इच्छुकांकडून सशुल्क अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. जिल्हा कार्यालयांकडे विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून त्यातील इच्छुकांची नेमकी समजू शकलेली नाही.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस व या पक्षाची आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर ते या पक्षातर्फे आपल्या कन्येला भोकरमधून आमदार करण्याच्या तयारीला लागले असतांना, काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात चव्हाणांच्या कन्येविरुध्द लढण्यासाठी बी.आर.कदम यांच्यासारख्या अनुभवी संघटकापासून राहुल ब्रिगेडमधील संदीपकुमार देशमुख या उच्चशिक्षित तरुणापर्यंत तब्बल १४ इच्छुक समोर आले आहेत. सुभाष पाटील किन्हाळकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रकाश देशमुख आदींचा काँग्रेसकडे उमेदवारी मागणार्यांमध्ये समावेश आहे.

विद्यमान आमदारांपैकी माधवराव जवळगावकर(हदगाव) आणि मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली तर विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदार जितेश अंतापूरकर पक्षाकडे फिरकलेच नाहीत. त्यांच्या देगलूर (राखीव) मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वाधिक अर्ज आल्याचे सांगण्यात आले. माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी काँग्रेस पक्षासोबत राहण्याची भूमिका दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथून जाहीर केली होती. बुधवारी येथे परतल्यानंतर त्यांनी नांदेड (उत्तर) मतदारसंघात पक्षाकडे उमेदवारी मागितली. माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर (मुखेड) यांनीही उमेदवारी मागितली आहे.

आणखी वाचा-सत्तेचा निर्णय महिलांच्या हाती! जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

मागील काळात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राहिलेले प्रा.यशपाल भिंगे व सुरेश गायकवाड यांनी अनुक्रमे मुखेड व देगलूरच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज दाखल केला.पक्षाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसह महानगर काँग्रेसचे अध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.हदगावचे आमदार माधवराव जवळगावकर यांनी गुरुवारी आपल्या अनेक समर्थकांसह पक्ष कार्यालयात येऊन उमेदवारी मागणीचा अर्ज सादर केला.

नायगाव मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी आपल्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांनी मिळावी यासाठी भास्करराव खतगावकर यांनी प्रयत्न सुरु केले आहेत;पण हा मतदारसंघ आमच्याच हक्काचा असा दावा करत खा.वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. कंधार व किनवट या मतदारसंघातूनही काही इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केला आहे.

आणखी वाचा-पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

काँग्रेस नेते नांदेडमध्ये

काँग्रेस पक्षाच्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ११ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आली असून या बैठकीसाठी पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात,आ.अमित देशमुख आदी येथे येणार आहेत. या बैठकीची पूवर्र्तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून पक्षातर्फे माजी मंत्री अनिल पटेल शुक्रवारी आढावा घेणार आहेत.