संतोष प्रधान
पश्चिम बंगालमध्ये पाय रोवण्यासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावले होते. पण तीन वर्षांत चित्र पुन्हा बदलू लागले असून, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा स्वगृही परतण्यावर भर दिला आहे. भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी रविवारी अधिकृतपणे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अर्जुन सिंह हे आधी तृणमूल काँग्रेसमध्येच होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बाराकोप मतदारसंघातून ते निवडून आले होते. भाजपने त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. गेले काही दिवस अर्जुन सिंह हे भाजपमध्ये नाराज होते. तागाच्या किंमतीवरून केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयावर ते नाराज होते. तागाच्या किंमतीवरील बंधने हटविण्यावरून त्यांनी केंद्राकडे नापसंती व्यक्त केली होती. बाराकोप या त्यांच्या मतदारसंघात ताग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. किंमतीवरील नियंत्रण उठविल्याने तागाची निर्मिती करणाऱ्यांनी नाराजी सिंह यांनी ओढवून घेतली होती .

सिंह हे प्रदेश भाजपमधील गटबाजीला कंटाळले होते. त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून दिल्लीतील केंद्रीय नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते. शेवटी अर्जुन सिंह यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा आमदार मुलगाही त्यांच्याच मार्गाने जाईल अशी चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यावर बाबूल सुप्रियो यांनी खासदारकीचा आणि भाजपचा राजीनामा दिला होता. सुप्रियो यांनी पक्ष सोडू नये म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले होते, पण सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खासदारकीचा राजीनामा दिल्यावर त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेची पोटनिवडणूक लढविली आणि ते आता आमदार म्हणून निवडून आले आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना  तृणमूल काँग्रेसकडून मंत्रिपदाची  संधी दिली जाईल अशी चिन्हे आहेत.

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल राॅय यांनी पक्षात ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे प्रस्थ वाढल्याने नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. वास्तविक तेव्हा राॅय हे पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. भाजपने विधानसभा निवडणुकीची सारी जबाबदारी मुकूल राॅय यांच्यावर सोपविली होती. विशेषत: तृणमूलमध्ये फूट पाडून जास्तीत जास्त नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती व त्यांनी ती पार पाडली होती. पण विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याला कंटाळून मुकूल राॅय यांनी अखेर पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या सहा आमदारांनी आतापर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वाश्रमीचे तृणमूलचे मात्र भाजपमधून निवडून आलेले काही आमदार तृणमूलच्या संपर्कात आहेत. काही जण टप्प्याटप्प्याने प्रवेश करतील, असे सांगण्यात येते.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने पश्चिम बंगालमध्ये वातावरण निर्मिती केली होती. लोकसभेत भाजपचे १८ खासदार निवडून आल्याने पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणारच अशी हवा भाजपने निर्माण केली होती. पण विधानसभा निवडणुकीत भाजपचा फुगा फुटला. पक्षाचे ७७ आमदार निवडून आले. याउलट तृणमूल काँग्रेसचे २१३ आमदार निवडून आले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ पैकी जास्तीत जास्त खासदार निवडून आणून राष्ट्रीय पातळीवर आपले महत्त्व वाढविण्याची ममतादिदींची योजना आहे. यासाठी भाजपला कमकुवत केले जात आहे.