गेली दहा वर्षे खासदार असताना मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यात किती यश आले ?

– गेली दहा वर्षे मी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी, झोपडपट्टी यांचा पुर्नविकास हाच ध्यास आहे. बीडीडी इमारतींचा पुर्नविकास सुरु झालेलाा आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. माझा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. माझे जन्मस्थळ असलेल्या धारावीचा कायापालट धारावीची जगात एक नवीन ओळख निर्माण करणारा आहे. धारावी पुर्नविकासानंतर या क्षेत्रात बहुउद्देशीय सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

धारावी पुनर्विकासावरून सुरू झालेल्या विरोधाबाबत आपली भूमिका काय आहे ?

– धारावी पुनर्विकासाला राजकीय हेतूनेच विरोध केला जात आहे. धारावीतील झोपडपट्टीवासियांना चांगली घरे मिळू नयेत का ? त्यांनाही चांगली व हक्काची घरे मिळण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करताना कोणालाही विस्थापित करणार नाही, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार स्थानिकांना आश्वस्त केले आहे. धारावीकरांचा या प्रकल्पाला विरोध नाही. फक्त आम्हाला घरे मिळावीत, अशी त्यांची रास्त भूमिका आहे. सरकार त्यासाठी बांधिल आहे. पुनर्वसन प्रकल्पामुळे धारीवकरांचा फायदाच होणार आहे.

हेही वाचा >>>राम मंदिरानंतर ‘कृष्ण मंदिरा’साठी भाजपाला हव्या चारशेपार जागा?

पंजाबी काॅलनी, चेंबूर बॅरेक्स, म्हाडा वसाहती यांचा कधी पुर्नविकास होणार ?

-माझ्या मतदार संघात फाळणीनंतर राहणाऱ्या निर्वासितांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन विकास आराखडा तयार करुन घेतला आहे. ३८८ म्हाडा वसाहतींचा प्रश्न मार्गी लागला आहे. पगडी देऊन गेली अनेक वर्ष मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्यांना विकासाचे अधिकार मिळाले आहेत. भाडोत्री आणि मालकांमधील वाद संपला आहे. त्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करुन वटहुकुम काढला. त्यामुळे पुर्नविकासाचे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतील अनेक प्रकल्प सुरु आहेत पण काही प्रकल्प रखडलेले आहेत. विकासकांना हे प्रकल्प पूर्ण करायचे नसतील तर त्यात शासन आपली भूमिका बजावणार आहे. हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना चांगली घरे मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी रखडलेल्या प्रकल्पात शासनाच्या वतीने एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको अथवा पालिका गुंतवणूक करणार आणि गरीबांच्या चांगल्या घराचे स्वप्न पूर्ण करणार. रहिवाशांना घरे मिळाल्यानंतर शिल्लक घरे विकून या संस्था आपली गुंतवणूक व्याजासह घेऊ शकणार आहेत. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. मतदार संघात एकूण १९ गावठाण वसाहती आहेत.

हेही वाचा >>>शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्धच झाला नाही!

शिवसेनेचे रणनीतीकारांचे तुम्हाला किती आव्हान आहे ?

– शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. माझे प्रतिस्पर्धी अनिल देसाई हे बाहेरच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मतदारांशी त्यांचा संर्पक नाही. मी २४ तास लोकांसाठी उपलब्ध आहे. करोना काळात आपल्या माणसाशी एक नाते तयार झाले आहे. त्याकाळात कोणीही केलेली मदत जनता विसरत नाहीत. धारावीत करोनाचा विस्फोट होईल असे वाटत असताना आम्ही लोकांना विश्वासात घेऊन ती लढाई जिंकू शकलो. त्यामुळे मतदारांशी नाळ जुळलेला उमेदवार त्यांना हवा आहे. रणनिती ठरवणारा नको. हा मतदार संघ बााळासाहेब ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन विचारांना मानणारा आहे. हे दोन्ही विचारांचे आम्ही अनुयायी आहोत.

(मुलाखत : विकास महाडिक)