सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हाती ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चढाओढ लागली आहे. पालकमंत्री हेच सूत्रधाराची भूमिका बजावत असल्याने आजवर पुणे शहरावर नजर ठेवणारे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे पाटील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार या दोन ‘दादां’मध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. आगामी काळातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ‘दादागिरी’ वाढणार आहे.

हेही वाचा… पंकज गोरे – रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता

भाजपने ‘बारामती मिशन‘ जाहीर केल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच भाजपने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आजवर पुणे महापालिकेच्या कारभारावर नजर ठेवणारे चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबरच जिल्ह्याच्या नियोजनात लक्ष घातले आहे. दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने रणनीतीला आता सुरुवात केली आहे.

हेही वाचा… “…तरच हे सरकार जाईल”, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे महापालिकेचा गेल्या पाच वर्षांचा कारभार हा खासदार गिरीश बापट यांना बाजूला करून पाटील यांनी हाती घेतला. महापालिकेतील निर्णय हे पाटील यांच्या सूचनांनुसार घेण्यात येत होते. त्यामुळे पुण्यात पावसानंतर रस्त्यांवर खड्डे पडल्यावर पाटील यांनी जाहीरपणे याची जबाबदारी स्वीकारत पुणेकरांकडे दिलगिरी व्यक्त केली. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महापालिकेवर सत्ता होती. त्यापूर्वी काँग्रेसकडे एकहाती कारभार होता. काँग्रेसलाही पुण्यातील खड्ड्यांमुळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे अगोदरच दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याने विरोधकांच्या विरोधाची धार कमी झाली. पुणे महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विशेषत: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने निवडणूक सोयीची होण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केलेल्या २३ गावांसह प्रभाग रचना केली. तसेच तीन सदस्यीय प्रभाग केले. आता ही गावे वगळण्यासाठी जोर लावण्यात आला आहे. तसेच प्रभाग रचनेतही बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपला चार सदस्यीय प्रभाग हवा आहे. त्यावरून अंतर्गत रणनीती सुरू झाल्याने आगामी काळात चंद्रकांत पाटील विरूद्ध अजित पवार यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी या दोन्ही दादांची दादागिरी पणाला लागणार आहे.

हेही वाचा… “राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार”, जयंत पाटील यांचं मोठं विधान!

पुण्यानंतर आता पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेतला. वरकरणी ही आढावा बैठक असली, तरी आगामी काळात या महापालिकेची सूत्रेही हाती घेण्याचा पाटील यांचा मानस दिसून आला आहे. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर त्यांची भिस्त असली, तरी प्रत्यक्ष नियोजन चंद्रकांत पाटील यांच्या सूचनांनुसार केले जाणार आहे. पुण्यानंतर पिंपरी- चिंचवडची सूत्रे पाटील यांनी हाती घेण्यास सुरुवात केली असताना अजित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत पिंपरी- चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची आहे. या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी कारभार राहिला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत पवार यांच्या साथीदारांना फोडून भाजपने सत्ता काबीज केली. त्यामुळे हा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागली आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरामध्येही दोन्ही दादांमधील सत्तासंघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… राहुल गांधींसोबत पदयात्रेसाठी नागपूर, चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांचा मॉर्निंग वॉक सुरू

जिल्ह्याचा कारभार हाताळण्यासाठी ‘पीएमआरडीए’ आणि जिल्हा नियोजन समिती या दोन सरकारी यंत्रणा नियोजन आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूमिका बजावित असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी या दोन यंत्रणांच्या माध्यमांतून अजित पवार यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. मात्र, पाटील यांनी आढावा घेत जिल्ह्याचा नियोजनात आपली भूमिका महत्त्वाची असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात जिल्हा नियोजन समितीद्वारे विकासकामांसाठी मंजूर केलेला निधी आता वळविला जाणार आहे. त्यादृष्टीने पाटील यांच्याकडून तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भाजपला सोयीच्या असलेल्या भागाला विकासकामांचा निधी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेलाही सामावून घेतले जाणार आहे. विकासकामांच्या निधीसाठी ६० टक्के भाजपला आणि ४० टक्के बाळासाहेबांची शिवसेनेला असे सूत्र या दोन्ही पक्षांनी निश्चित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला कमी निधी येणार आहे. त्यावरूनही पाटील विरूद्ध पवार असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे या दोन्ही दादांची ’दादागिरी’ विकासाला मारक ठरणार की पूरक, हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The political battle between chandrakant patil and ajit pawar is with full swing for dominance in pune district print politics news asj
First published on: 04-11-2022 at 11:12 IST