सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा प्राधिकरणातील पदवीधर गटासाठी झालेल्या दहा जागांच्या निवडणुकीत महाआघाडीचा भुलभुलैय्या करून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शिवसेना व युवा सेनेला (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चांगलाच झटका देत आपला “उत्कर्ष” साधून घेतला. पूर्णपणे आमदार चव्हाणांवर विसंबून राहणे शिवसेनेला भोवले आहे.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

या निवडणुकीसाठी पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे आदेश असतानाही स्थानिक एकाही मोठ्या नेत्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लक्ष घातले नाही. सेना नेते, पदाधिकाऱ्यांचे हे अलिप्ततावादी धोरण अंगलट आले. आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुकीत लक्ष घालून स्वतः व युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून आमदार चव्हाण यांच्याशी संवाद ठेवला होता.

हेही वाचा: पालघर खासदारकीवरून भाजपा-शिंदे गटात चढाओढ

महाविकास आघाडीसाठी शिवसेनेकडून हात पुढे करून वरुण सरदेसाई यांनी स्वतः आमदार चव्हाण यांची येथे भेट घेतली होती. या भेटीत मोठ्या नेत्यांना सोबत न घेताच आघाडीची बोलणी केली होती. या भेटीत चव्हाण यांनी आघाडीसाठी तोंडी अनुकूलता दर्शवली तरी प्रत्यक्षात अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत त्यांनी शिवसेनेला झुलवत ठेवले. अखेर शिवसेनेला त्यांचे दहा उमेदवारांचे शिवशाही पॅनल करून निवडणुकीत उतरावेच लागले. त्यातही एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. तत्पूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराने आघाडीचा आकार दिसत नसल्याने माघार घेतली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या निवडणुकीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. चव्हाणांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच पटोले यांनी निवडणुकीला फार महत्त्व दिले नाही. परिणामी विद्यापीठावर पूर्ण वरचष्मा मिळवण्याची चव्हाणनीती यशस्वी ठरताना दिसू लागली. मात्र, नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत उत्कर्ष पॅनलला धक्का बसला. त्यांच्या दोन महिला उमेदवारांचे अर्ज नावांमधील घोळामुळे अवैध ठरवण्यात आले आणि न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली तेव्हा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या उत्कर्ष पॅनलकडून शिवसेनेला तीन जागा देऊ करण्यात आल्या. त्यातील एक जागा महिला उमेदवारासाठी सोडली.

या महिला उमेदवाराच्या विजयासाठी हातभार लावत आघाडीधर्म पाळल्याचे भासवले. मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नसल्याचा आरोप केला जात आहे. खुल्या गटातील पाचही उमेदवार उत्कर्षचेच निवडून येतील, अशी रणनीती आखण्यात आली. शिवसेनेशीच संबंधित एका नेत्याच्या महाविद्यालयाकडून नोंदणी केलेली मते उत्कर्ष पॅनलकडे वळल्याचा आरोपही चव्हाण यांच्यावर होत आहे. परंतु चव्हाण हे त्यांनी सोडलेल्या तीनही जागांवर शिवसेनेचेच उमेदवार निवडून आणतील या भ्रमात स्थानिक दिग्गज नेते बसले आणि पराभवाची नामुष्की ओढवून घेतली.

हेही वाचा: राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी

अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ते राज्यात पर्यावरण आणि पर्यटनमंत्री असतानापासून जोर लावल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीनंतर अधिसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले होते. त्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपासून ते नगरसेवकपदासाठी तिकीट मागणाऱ्यांसाठीही मतदार नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दरम्यान, राज्यात सत्तांतर घडले आणि शिवसेनेचे स्थानिक नेते ढिले पडले.या निवडणुकीत स्थानिक प्रमुख नेत्यांनी कार्यकर्ते, उमेदवारांची विचारपूसही केली नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची एखादी बैठकही घेण्यात आली नाही. शिवाय चव्हाण यांच्याशीही संवादातील सातत्य ठेवता आले नाही.

त्याउलट चव्हाण यांनी नियोजनबद्ध तयारी केली होती. मतदार नोंदणीसाठी वर्ष-दीड वर्षांपासून त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या दीडशेपेक्षा अधिक संख्येने विस्तारीत शाखांमधील प्रत्येक व्यक्तीला उद्दिष्ट देऊन काम करून घेतले होते. आम्ही मतदार नोंदणीसाठी मोठी मेहनत घेतली, आयतेच कसे शिवसेनेला निवडून आणायचे, असे उत्कर्षचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. तेव्हाच चव्हाणांचे उत्कर्ष पॅनल शिवसेनेला हात दाखवेल, असा अंदाज बांधला जात होता. शिवसेनेच्या उमेदवारांमध्येही चव्हाण यांच्या खेळीबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. त्या विषयी वरुण सरदेसाई यांनाही माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा: ओम राजेनिंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील यांच्यात दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्षाचा इतिहास

मात्र सरदेसाईंसह स्थानिक नेतेही चव्हाण यांच्यावर विसंबून बसले आणि निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. चव्हाण यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत संघटनेची मदत घ्यावीच लागेल आणि त्या गरजेपोटी ते शिवसेनेचे उमेदवार निवडून आणतील, या भ्रमात स्थानिक नेते राहिले. अधिसभा निवडणुकीत उत्कर्षचे आठ उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा विजयही उत्कर्षच्याच पाठबळावर मानला जात आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी प्रणित विद्यापीठ विकासमंचच्या एकमेव महिला सदस्याच्या रुपात निवडून आलेल्या जागेलाही उत्कर्षचा अप्रत्यक्ष हातभार लाभल्याची चर्चाही नव्याने सुरू झाली आहे.