पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द होणे, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून झालेला गोंधळ, नेत्यांमधील दुफळी, पहिल्या फळीतील काही नेत्यांची पक्ष सोडण्याची मानसिकता, तसेच आगामी निवडणुका या साऱ्या आव्हानांचा सामना करीत रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
हेही वाचा – कोल्हापूर जातीय तणावामागे राजकारणाची किनार?
अजित पवार यांच्याबाबत अलीकडेच पुन्हा एकदा संंशयाचे वातावरण निर्माण झाले. अजितदादा भाजपबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली असली तरी त्यावर विश्वास ठेवायला पक्षातील नेतेही तयार नाहीत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादीचे भवितव्य ठरेल, असा अंदाज वर्तविला जातो. कारण लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यास राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील राज्यातील बडे नेते भाजपमध्ये दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविला जाते. राजीनाम्याची घोषणा करून नंतर मागे घेतल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी त्यातून त्यांनी अजितदादांना खिंडीत पकडल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीची आगामी काळातील वाटचाल ही पवार काका-पुतण्याचे संबंध कसे राहतात यावरही बरीच अवलंबून असेल. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर अजित पवार यांचा एकमेव अपवाद वगळता सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदींच्या डोळ्यात आश्रू आले होते.
२४ वर्षांत राष्ट्रवादीने बरेच काही साधले. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील हे पवारांचे गणित मात्र चुकले. पक्षाच्या स्थापनेनंतर चारच महिन्यांत राज्याच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली होती. शरद पवार यांची ६० आमदार निवडून आणण्याची क्षमता, असे नेहमी बोलले जाते. काँग्रेसबरोबर आघाडीत २००४ मध्ये ७१, २००९ मध्ये ६२ तर २०१९ मध्ये ५४ आमदार निवडून आले. राज्याच्या सत्तेत सारी महत्त्वाची खाती, सरकारवर वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीला रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असतानाही राज्याच्या सर्व भागांमध्ये ताकद निर्माण करता आली नाही. विदर्भ आणि मुंबईत गेल्या दोन दशकांमध्ये पक्ष ताकदीने उभा राहू शकला नाही. या दोन्ही भागांमध्ये पक्षाला अल्प यश मिळत गेले.
पक्षाची सहकारावरील मक्तेदारी हे राष्ट्रवादीच्या यशाचे सर्वाधिक गमक आहे. पण मक्तेदारीवर घाला घालण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. सहकारातील विविध ताकदवान नेते भाजपच्या आश्रयाला जात आहेत. सहकारावरील वर्चस्व टिकवून ठेवण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान असेल. कारण सत्ता असल्याशिवाय सहकारावर वर्चस्व ठेवता येत नाही.
नेतेमंडळींमधील दुफळीही सध्या प्राकर्षाने जाणवत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परस्परांवर जाहीरपणे कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. आगामी निवडणुका राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई ठरेल. लोकसभा तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा वा पंचायत समित्यांमध्ये पक्षाला यश मिळाले तर विधानसभा निवडणुका लढविण्याकरिता बळ मिळेल. या दोन निवडणुकांमध्ये फार काही चांगले यश मिळाले नाही तर राष्ट्रवादीला गळती लागू शकेल. यामुळेच राष्ट्रवादीसाठी रौप्यमहोत्सवी वर्ष अधिक कसोटीचे ठरणार आहे.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The silver jubilee year is a test for the ncp print politics news ssb