यवतमाळ – सुरुवातीच्या काळापासनू राज्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या पुसद येथील नाईक कुटुंबियांत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांच्या दोन्ही मुलांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या बंजाराबहुल मतदारसंघात मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांनी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील वादामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुसद हा बंजाराबहुल मतदारसंघ आहे. येथे बंजारा, आदिवासी, मराठा, कुणबी समाजाची मते अधिक आहेत. ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मागितली होती. मात्र शरद पवार यांनी येथे मराठा कुणबी समाजाचे शरद मैंद यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ची उमदेवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ययाती यांनी आपल्या फलकांवर वडील मनोहरराव नाईक यांचेही छायाचित्र वापरले नाही. केवळ वंसतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे छायाचित्र लावल्याने नाईक कुटुंबातील वादाबद्दल विविध चर्चा मतदारसंघात आहे.

हेही वाचा – भाजपने भाकरी फिरवली, ‘या’ विद्यमान आमदारांना घरीच बसवले

शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुधाकरराव नाईक त्यांच्यासोबत गेले. तेव्हापासून नाईक कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. गेल्यावर्षी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पुसदचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटात गेले. त्यांचे वडील मनोहरराव नाईक यांनी याबाबत कधी जाहीर भाष्य केले नसले तरी मुलासोबत तेही अजित पवार गटात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ययाती यांना वडील मनोहरराव नाईक यांची साथ नसावी, अशी चर्चा आहे.

नाईक कुटुंबातील इंद्रनील आणि ययाती या भावांमधील वादाचा फायदा महाविकास आघाडी करून घेण्याच्या तयारीत आहे. मनोहरराव नाईक व त्यांचा मुलगा आमदार इंद्रनील नाईक यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार यांनी ययाती यांना उमेदवारी न देता एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीची उमेदवारी न दिल्यास ययाती नाईक हे बंडखोरी करणार हे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या बंजाराबहुल मतदारसंघात जाणीवपूर्वक मराठा उमेदवार दिला. बंजारा मते नाईक कुटुंबियात विभाजित झाल्यास मराठा, कुणबी, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याकांची मते महाविकास आघाडीकडे वळतील, या सुत्राने शरद पवार यांनी पुसदमध्ये खेळी खेळल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – बंडाळीमुळे राजकीय समीकरण बदलणार, ‘अकोला पश्चिम’मध्ये महायुती व मविआची डोकेदुखी वाढली

नाईक कुटुंबातील हा वाद कायम राहिल्यास तो महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल, असे चित्र सध्या आहे. मात्र ययाती नाईक यांची मनधरणी करून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्‍यात महायुती व इंद्रनील नाईक यांना अपयश आल्यास येथील लढत रंगतदार होणार आहे. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a split in the naik family in pusad brothers against each other competition between indranil naik and yayati naik print politics news ssb