महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ६ वा ७ एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधारी असल्याने उमेदवारांची घोषणा तुलनेत उशिराच होणार होती. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि केंद्रीय नेतृत्वामध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली असून मोदी-शहांसमोर त्यांना सांभाळून घेण्याचा नाइलाज झाला आहे.

‘मी ८० वर्षांचा झालोय, मी निवडणूक लढवणार नाही. पण, माझा मुलगा शिकारीपुरा मतदारसंघातून लढेल’, अशी गुगली येडियुरप्पा यांनी पत्रकार परिषदेत टाकल्यापासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अडचण झाली आहे. येडियुरप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना शिकारीपुरामधून उमेदवारी दिली तर नजिकच्या भविष्यात येडियुरप्पांचा राज्याच्या राजकारणातील हस्तक्षेप कायम राहणार. विजयेंद्र यांना उमेदवारी देणे टाळले तर आधीच गोत्यात आलेल्या भाजपचा कर्नाटकातील पराभव अटळ असेल. येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडल्यानंतर, त्यांना भाजपच्या संसदीय मंडळात सामील करून घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऐनमोक्याच्या क्षणी येडियुरप्पांनी उचल खाऊ नये याची दक्षता भाजपला घ्यावी लागत आहे.

हेही वाचा… वंचित आघाडीकडून भाजप लक्ष्य

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील दौरे वाढू लागले आहेत. प्रत्येकवेळी मोदींसोबत येडियुरप्पा दिसतात. फेब्रुवारीमध्ये भाजप आणि येडियुरप्पांचा बालेकिल्ला असलेल्या शिवमोगाला मोदींनी भेट दिली होती. तिथल्या विमानतळाला येडियुरप्पांचे नाव दिले गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कर्नाटक दौऱ्यात विजयेंद्रला जवळ करत येडियुरप्पांच्या हातातून पुष्पगुच्छ घेतले होते. भाजपसाठी कुठल्याही निवडणुकीत मोदी हेच प्रमुख प्रचारक असतात पण, कर्नाटमध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वाखाली प्रचार केला जाईल असे भाजपला जाहीर करावे लागले आहे.

हेही वाचा… सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

म्हैसूर कर्नाटकमध्ये वरुणा मतदारसंघावर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्यांचे वर्चस्व राहिले आहे. यावेळीही ते कदाचित दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवतील, त्यातील एक परंपरागत वरुणा मतदारसंघ असेल. इथून येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याचा घाट केंद्रीय नेतृत्वाने घातल्याचे सांगितले जाते. या निर्णयाला आधी येडियुरप्पांनी हलक्या आवाजात होकार दिला होता पण, शिकारीपुराचा गड हातून घालवायचा नसल्याने येडियुरप्पांनी थेट केंद्रीय नेतृत्वाला पत्रकार परिषदेतून इशारा देत विजयेंद्र वरुणातून लढणार नसल्याचे कळवले आहे.

हेही वाचा… भाजपच्या ओबीसी अपमान प्रचाराच्या मुकाबल्यासाठी काँग्रेसही मैदानात

कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कालिग हे दोन प्रभावी जातसमूह असून येडियुरप्पा लिंगायत समाजातून येतात. लिंगायत समाजाने काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर येडियुरप्पांच्या नेतृत्वाखालील भाजपशी हा समाज एकनिष्ठ राहिलेला आहे. कर्नाटकामध्ये लिंगायत १६-१७ टक्के असून २२४ पैकी सुमारे १०० मतदारसंघांमध्ये लिंगायत मते निर्णायक ठरतात. येडियुरप्पांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केल्यानंतर लिंगायत समाजातील बसवराज बोम्मई यांची वर्णी लागली. लिंगायत समाज नाराजी टाळण्यासाठी ही तात्पुरती तडजोड भाजपच्या नेतृत्वाने केली. येडियुरप्पांचा कारभार एककल्ली होता, त्यांच्याकडे भाजपच्या नेतृत्वाला शह देण्याची ताकद होती. बोम्मईंचा कारभार प्रभावहिन ठरला आहे. बोम्मईंच्या नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवू शकत नाही. येडियुरप्पांना सत्तेपासून बाजूला केल्यामुळे नाराज झालेले लिंगायत मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळाले तर लढाई आणखी कठीण होईल, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटते.

हेही वाचा… कर्नाटकमध्ये मुस्लिमांचे आरक्षण काढले, पण जैन आणि ख्रिश्चनांना मात्र राखीव जागांचा लाभ मिळणार

पण, येडियुरप्पांची मागणी अजून तरी भाजपच्या नेतृत्वाने मान्य केलेली नाही. विजयेंद्रला शिकारीपुरामधून उमेदवारी देण्याचे संकेतही दिलेले नाहीत. विजयेंद्रविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झालेले असल्याने ईडीचा फटका तर बसणार नाही, या विचाराने येडियुरप्पांनी पत्रकार परिषद घेऊन इरादा स्पष्ट केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no alternative for yediyurappa in karnataka for amit and narendra modi print politics news asj
First published on: 01-04-2023 at 14:29 IST