पुणे जिल्ह्यातील शिरूर-मावळमध्ये सेनेत खदखद

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूरच्या ग्रामीण पट्ट्यातून शिवसेनेचे दोन खासदार निवडून येतात, हीच राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठी नामुष्की ठरत होती.

Maval and Shirur Shivsena

बाळासाहेब जवळकर

शिवसेनेत नियोजनबध्द बंडाळी झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू राजकीय भूकंप झाला. याचे धक्के सर्वदूर जाणवले. अगदी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरही अपवाद राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र होते तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत शिरूर आणि मावळ लोकसभेच्या राजकारणात शीतयुध्द सुरू होते. एकीकडे शिवसेनेत राजकीय उलथापालथ सुरू असतानाही पक्षातील ही अंतर्गत खदखदही चव्हाट्यावर आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूरच्या ग्रामीण पट्ट्यातून शिवसेनेचे दोन खासदार निवडून येतात, हीच राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठी नामुष्की ठरत होती. जोपर्यंत दोन्ही पक्ष विरोधात लढत होते, तोपर्यंत समोरासमोर संघर्ष अपरिहार्य होता, आरोप-प्रत्यारोप होतच होते. एकमेकांचे उट्टे काढण्याची संधी कोणीही सोडत नव्हते.  मात्र, २०१९ मध्ये, राजकीय अपरिहार्यतेतून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून दोन्ही पक्षातील नेत्यांना हा उघड संघर्ष थांबवावा लागला. अंतर्गत धुसफूस मात्र अजूनही सुरूच आहे. अगदी शिवसेनेतील बंडाळी उफाळून आल्यानंतरही ती जाणवत होती.

अजित पवार हे राष्ट्रवादीतील लोकप्रिय नेते. ते उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा कायम वरचष्मा राहिला. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी शिवसेनेची स्थानिक पातळीवर घुसमट होत होती आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून मांडली जात होती. तथापि, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी झालेल्या तडजोडीमुळे उध्दव ठाकरे लक्ष देत नाहीत, अशी भावना शिवसैनिकांमध्ये होती.
पक्षात बंडाळी झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांना पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातही ही खदखद व्यक्त झाली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी, शिवसैनिकांच्या दबलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. अजित पवारांचे पुणे जिल्ह्यातून शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप आढळरावांनी केला. प्रत्येक पातळीवर राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असून गावोगावी शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे, असे सांगत अनेक उदाहरणे देऊन आढळरावांनी राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी अधोरेखित केली.

महाविकास आघाडीने भाजपविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय झाल्यास विद्यमान खासदार म्हणून शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीच दावा करणार, हे उघडपणे दिसत होते आणि सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीचा युक्तिवाद खोडताही येणार नाही, अशी शिवसेनेची अडचण होती. शक्य तिथे मदत करून अजित पवार शिरूरसाठी खासदार कोल्हे यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच आहेत. कोल्हे, मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी नेत्यांच्या कार्यपध्दतीमुळे शिरूर लोकसभेत शिवसेनेचा ऱ्हास होत चालल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. नेमकी तीच खदखद आढळरावांनी संपर्क प्रमुखांसमोर व्यक्त केली. ठोस उत्तर नसल्याने तेही निरूत्तर झाले.

दुसरीकडे, मावळ लोकसभेच्या राजकारणात थोड्याफार फरकाने अशीच अस्वस्थता जाणवते. मावळ लोकसभेतून शिवसेनेचे श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. २०१९ मध्ये त्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला. बारणे आणि पवार यांच्यात अनेक वर्षे सोयिस्कर राजकीय संबंध होते. तथापि, लोकसभेच्या आखाड्यात समोरासमोर लढल्यानंतर त्यांच्यातील सोयरिक बिघडली. बारणे यांनी पार्थचा पराभव केला, त्यानंतर अजित पवारांनी बारणे यांच्यापासून शक्य तितके अंतर ठेवले. बारणेदेखील त्यांच्याशी सलगी ठेवण्यास फारसे उत्सुक नव्हते. २०२४ च्या दृष्टीने लोकसभेसाठी महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेचा हक्क कायम ठेवून मावळमधून बारणे यांनी लढायचे की अजित पवारांच्या पुत्राचा दावा गृहीत धरून मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायची, हा तिढा असणार होता. तेव्हा अजित पवारांची बाजू सरस ठरू शकते, असे संकेत मिळत होते. दुसरा मुद्दा म्हणजे, बारणे यांचे ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is unrest among shirur and maval shivsena print politics news pkd

Next Story
होय, फडणवीसांवर अन्याय झाला!, गड आला पण सत्ता आणणारा सिंह गेला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी