दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता याच कारणावरून काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. ही अस्वस्थता अशीच राहिल्यास भविष्यात शिवसेनेप्रमाणेच या पक्षालाही त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.

महाविकास आघाडीची सत्ता अडीच वर्षे होती. या कालावधीत शिवसेनेप्रमाणे काँग्रेसलाही फारसे महत्त्व मिळू नये, पक्षाचा विस्तार होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न करण्यात आले. अगदी प्रारंभीच्या काळात स्व. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले सांगली बाजार समितीचे अख्खे संचालक मंडळच राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. आघाडीतील मित्रांनी आघाडी धर्माचे पालन करावे असे काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीरपणे सांगूनही याला राष्ट्रवादीने पर्यायाने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी बेदखल करत केवळ राष्ट्रवादीच्या विस्ताराचेच हित जोपासले.

हेही वाचा- आदिवासींना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचे शिवाजीराव मोघे यांच्यासमोर आ‌व्हान, अ. भा. आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

राज्यात सत्तेसाठी एकत्र येताना स्थानिक पातळीवर मात्र मित्र पक्षांनाच रोखण्याचे हे काम आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेसविरोधी जपले जाणारे हे धोरण बदलावे अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत आहे. हे कमी म्हणून की काय सांगली महापालिकेतील काँग्रेसचा मोठा गट राष्ट्रवादीत यावा यासाठी देखील या माजी मंत्र्याच्या वतीनेच प्रयत्न झाले. माजी मंत्री मदन पाटील यांचा महापालिकेतील गट राष्ट्रवादीच्या वाटेवर होता. मात्र, अखेरच्या क्षणी डॉ. कदम यांनी समजूत काढून श्रीमती जयश्री पाटील यांची राष्ट्रवादीची वाट रोखली.

महापालिकेत सत्तांतर करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळ जास्त असलेल्या काँग्रेसला मागे बसण्यास भाग पाडले. काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा घेत काँग्रेसची ताकद कशी कमी करता येईल याचेच आडाखे आतापर्यंत बांधले गेले. यामुळे शिवसेनेप्रमाणे आपलीही उद्या अशी अवस्था होऊ शकते याची जाणीव काँग्रेसला झाली आहे. ना पक्षाकडून पाठबळ, ना अडीअडचणीला धावून येण्याची क्षमता असलेले खमके नेतृत्व यामुळे सत्ताबदलानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा- ओबीसी लोकसंख्या कमी झाल्याने त्यातून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी

जिल्ह्यात डॉ. विश्वजित कदम आणि आ. विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे दोन आमदार आहेत. खरेतर ते पक्षापेक्षाही स्वबळावरच निवडून आलेले आहेत. त्यांचाच पक्षाला उपयोग होत आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत डॉ. कदम यांना जरी मंत्रीपद मिळाले तरी ते केवळ शोभेचे असल्याचे मत अनेकदा त्यांनी खासगीत व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील निर्णयात त्यांना आणि पर्यायाने काँग्रेसला बेदखल केलेले होते. महाविकास आघाडी असतानाही आघाडीचा नियम धाब्यावर बसवून आ. विक्रमसिंह सावंत यांचा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव घडवून आणण्यात आला. ज्या विभागात ते पराभूत झाले, तिथे निवडून आलेले प्रकाश जमदाडे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. म्हणजे भाजपमधील व्यक्तीला स्वपक्षात घेत त्याच्याकरवी काँग्रेसचा अडसर दूर करण्यात आलेला आहे. पलूस नगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधी मतामध्ये मतविभागणी होऊन काँग्रेसला फटका बसावा यासाठी आ. अरुण लाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे बळकटीकरण सुरू आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता.

प्रत्येक मतदारसंघात केवळ राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाला बळ कसे मिळेल याचाच विचार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमधून आज व्यक्त होत आहे. या पूर्वी अशी भावना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व्यक्त करत होते. त्यांनी बंड करत स्वत:ची मान सोडवून घेतली आहे, त्याच धर्तीवर आता काँग्रेसमध्ये अशाच प्रकारे राष्ट्रवादीविरोधात नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is unrest in sangali congress also print politics news pkd
First published on: 14-07-2022 at 10:07 IST