राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, यासाठी या भागातील काँग्रेस नेते उत्साहाने तयारीला लागले असून यात्रेत विदर्भातून ३० हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी व्हावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला (देगलूर- जि. नांदेड) दाखल होत आहे. तेथून ती १५ नोव्हेंबरला विदर्भात येणार असून पाच दिवसांत यात्रेचा प्रवास वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून होणार आहे. शेगावला (जि. बुलढाणा) जाहीर सभा आहे. यात्रा विदर्भातील तीन जिल्ह्यांतून जात असली तरी त्यात अकराही जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार नागपूर शहर आणि जिल्हा मिळून प्रत्येकी दोन हजार असे चार हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली आहे.यासंदर्भात नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक म्हणाले, दोन ते सव्वादोन हजार कार्यकर्ते नागपूर ग्रामीणमधून यात्रेसाठी नेण्याचे नियोजन असून ते १८ नोव्हेंबरला बाळापूर (जि. अकोला) येथे यात्रेत सहभागी होतील.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला; तिरंगा, राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचेही फलक

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातून दीड ते दोन हजार, गडचिरोली जिल्ह्यातून एक हजार, अमरावती जिल्ह्यातून चार हजार, यवतमाळ जिल्ह्यातून दोन हजार, वर्धा जिल्ह्यातून दीड ते दोन हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी वाहन व्यवस्था आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांला ओळखपत्र दिले जाणार आहे. वाशीम, अकोला, आणि बुलढाणा या यात्रेच्या मार्गातील जिल्ह्यातून प्रत्येकी किमान दोन ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.पक्ष कार्यकर्त्यांशिवाय विविध संघटनांचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते पाच दिवस सहभागी होणार आहेत. त्यांची नावे यात्रेच्या जिल्हा समन्वयकांकडे नोंदवण्यात आली आहेत.

हेही वाचा : मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भारत जोडो यात्रेत विसर; भाजप खासदार चिखलीकरांनी घडवून आणली बैठक

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा भंडारा येथून दीड ते दोन हजार आणि गोंदिया जिल्ह्यातून देखील दीड ते दोन हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील तयारीचा आढावा खासदार बाळू धानोरकर यांनी तर गोंदिया जिल्ह्याचा आढावा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी घेतला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty thousand people from vidarbha will participate in bharat jodo yatra congress leader rahul gandhi vashim akola buldhana nanded print politics news tmb 01
First published on: 08-11-2022 at 09:49 IST