प्रबोध देशपांडे

महाराष्ट्रात आलेल्या राजकीय वादळात पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांचे पालकत्व अस्थिर झाले आहे. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांच्यासह तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्री‘मविआ’शी ‘कड’वटपणा घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. या जिल्ह्यांचे पालकमंत्रीच संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर देखील झाला आहे.

शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांच्या मोठ्या गटासह बंडखोरी केली. गेल्या दोन दिवसांपासून ते आमदारांना घेऊन राज्याबाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आली. बंडखोरीच्या या नाट्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. एकनाथ शिंदेंच्या बंडखाेरीत काही मंत्री देखील सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. सूरत व गुवाहाटी येथे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते दिसले. बच्चू कडू यांच्यावर अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. आठवड्यातून एक-दोन वेळा जिल्ह्याचा ते दौरा करतात. बैठका घेऊन कामकाजाला गती देतात. आता बच्चू कडू ‘मविआ’ सरकार विरोधातील गटात गेल्याने पालकमंत्री संपर्कात नसल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई बंडाच्या सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी भौगोलिक दृष्ट्या लांबचे अंतर असल्याने त्यांचे जिल्ह्यात अत्यंत मोजकेच दौरे होतात. राष्ट्रीय सणांना ध्वजारोहणा पुरतेच वाशीमचे मर्यादित पालकत्व शंभूराज देसाई यांच्याकडे असल्याची टीका होते. इतरवेळी ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रशासनाकडून केवळ आढावा घेण्यातच धन्यता मानतात. आता तर ते संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांकडील जिल्ह्यातील कामकाज खोळंबले जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती आहे. आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे आले. त्यांचेही यवतमाळ जिल्ह्याचे प्रश्न, विकासाचे मुद्दे याकडे फारसे लक्ष नाही. त्यात आता त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत बंड केले आहे. त्यामुळे हे तीन जिल्हे सध्या वाऱ्यावर आहेत.