Bangladesh Election Hindu Candidate Winner List : माजी पंतप्रधान शेख हसीना पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये तब्बल १८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या पक्षाने मोठा विजय मिळविला. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगलादेशी मतदारांनी बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने कौल दिला. या निकालामुळे देशात दोन दशकांनंतर बीएनपी सत्तास्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान बांगलादेशात निवडून आलेल्या तीन हिंदू उमेदवारांची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
बांगलादेशात कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?
बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून लावण्यात आले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने देशाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. या राजकीय उलाढालीनंतर देशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अभूतपूर्व अशा बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत ‘बीएनपी’ मोठ्या बहुमताने निवडून आली आहे. निवडणूक निकालांनुसार २९९ जागांपैकी बीएनपीला २११ जागांवर यश मिळाले; तर जमात-ए-इस्लामी पक्षाला केवळ ६८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
ढाका मतदारसंघातून हिंदू उमेदवाराचा विजय
बांगलादेशमधील स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय निवडणुकीत अल्पसंख्याक हिंदू समाजातील तीन उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या तिन्ही उमेदवारांना बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते गयेश्वर चंद्र रॉय यांनी ढाका मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी ‘जमात-ए-इस्लामी पार्टीचे उमेदवार मोहम्मद शाहीनूर इस्लाम यांचा पराभव केला आहे. देशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री असलेल्या रॉय यांचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
मागूरा मतदारसंघातून निताई रॉय चौधरी यांचा विजय
मागूरा-२ मतदारसंघातून बीएनपीचे उपाध्यक्ष निताई रॉय चौधरी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामी पार्टीचे उमेदवार मुस्तारशिद बिल्लाह यांना पराभूत केले आहे. निवडणुकीत चौधरी यांना १,४७,८९६ मते मिळाली; तर मुस्तारशिद बिल्लाह यांना १,१७,०१८ मतांवरच समाधान मानावे लागले. गयेश्वर चंद्र रॉय यांचे नातेवाईक असलेले चौधरी हे बीएनपीमधील अल्पसंख्याकांचे एक प्रभावशाली नेते मानले जातात. अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात त्यांनी मिळवलेल्या विजयीची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे.
रांगमती मतदारसंघातून दिपेन देवान यांचा विजय
वकील दिपेन देवान हे बांगलादेशच्या निवडणुकीत विजय मिळवणारे तिसरे हिंदू उमेदवार ठरले. त्यांना बीएनपीने रांगमती मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले होते. त्यांच्याविरोधात एका अपक्ष अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. या निवडणुकीत देवान यांना ३१ हजार २२२ मते मिळाली; तर अपक्ष उमेदवार पहेल चकमा यांना २१ हजार ५४४ मतांवरच समाधान मानावे लागले आहे. याउलट जमात-ए-इस्लाम पार्टीने तिकीट दिलेल्या एकमेव हिंदू उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कृष्ण नंदी यांनी जमातच्या तिकिटावर खुलना-१ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तब्बल ७० हजार ३४६ मते मिळवूनही त्यांचा बीएनपीच्या उमेदवाराकडून पराभव झाला आहे.
किती अल्पसंख्याक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?
विशेष बाब म्हणजे- या निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीनंतर एकूण ७९ अल्पसंख्याक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यामध्ये १० महिला उमेदवारांचा समावेश होता. बीएनपीने सहा अल्पसंख्याक उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी चार जणांचा विजय झाला असून एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेश कम्युनिस्ट पक्षाने सर्वाधिक अल्पसंख्याक उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याची माहिती बांगलादेशातील माध्यमांनी दिली.
बांगलादेशमध्ये पुढे काय होणार?
बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने बहुमत मिळवल्याने पक्षप्रमुख तारिक रहमान यांच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब झाले आहे. १७ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई देशात हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे. रहमान यांच्यासाठी हे राजकीय पुनरागमन आहे. ६० वर्षीय रहमान डिसेंबरमध्ये लंडनहून मायदेशी परतल्यानंतर त्यावेळी बांगलादेशात मोठी राजकीय अस्थिरता होती. काही दिवसांतच त्यांची आई आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या निवडणुकीत त्यांना २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर बळ मिळवलेल्या धार्मिक कट्टरतावादी पक्षाचा सामना करावा लागला. त्या आंदोलनात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून हटवले होते. डिसेंबरमध्ये कट्टरपंथी युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. भारतानेही बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे तारिक रहमान यांच्या आगामी राजवटीत देशात नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

