कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणूक सावरकर विरुद्ध टीपू सुलतान या दोन विचारधारांमध्ये होईल, असं विधान भाजपा नेते नलीनकुमार कतील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या याविधानंतर कर्नाटकमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलं आहे. टीपू सुलतानच्या मुद्दावरून कर्नाटकमध्ये भाजपा विरूद्ध काँग्रेस असा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात टीपू सुलतानच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला.
संदर्भात न्यूज १८ शी बोलताना, “राजकीय नेते त्यांच्या सोईप्रमाणे टीपू सुलतान यांचे नाव वापरतात. असं करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही”, अशी प्रतिक्रिया टीपू सुलतानचे वंशज मन्सूर अली यांनी दिली. तसेच “यापुढे टीपू सुलताना यांच्या नावाचा गैरवापर करण्याऱ्यांविरोधात आम्ही अब्रुनुकसानी दावा दाखल करू”, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे बोलताना, “टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही”, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा –Tripura Election: भाजपासाठी त्रिपुरा निवडणूक सोपी नाही; प्रद्योत देववर्मा ठरतायत मोठे आव्हान
दरम्यान, कोलकाता येथे कपड्याचा व्यापार करणारे टीपू सुलतानचे सातवे पणतू इस्माईल शहा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी सातत्याने टीपू सुलतान यांचे नाव घेतात, त्याचं दुखं होतं असल्याचं” ते म्हणाले. तसेच “याचा आमच्या परिवाला मोठा त्रास सहन करावा लागला असून आम्हाला राजकारणापासून दूर राहायचं आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी टीपू सुलतानच्या जयंती साजरी करण्यावरही भाष्य केलं. “काँग्रेस टीपू सुलतान यांच्या नावाचा गैरवापर करत असून अल्पसंख्यक समुदायामध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात टीपू सुलतान हे महान शासक होते. त्यांनी आताच्या राजकीय नेत्यांपेक्षा चांगला राज्य कारभार केला”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मनमोहन सिंग यांचं कौतुक करत केसीआर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, “अकार्यक्षम…”
दरम्यान, यासंदर्भात बोलताना म्हैसूरचे भाजपाचे आमदार प्रताप सिम्हा म्हणाले, “भाजपाने कधीही टीपू सुलतानच्या नावाचा गैरवापर केला नाही. मात्र, काँग्रेस आणि कथित सेक्यूलर पक्षांनी टीपू सुलतानचा नावाचा वापर केवळ राजकारणसाठी केला. आम्ही फक्त इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो.”