पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचे नेते राजू डे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (३ जुलै) रात्री ११ च्या सुमारास घडली. कूचबिहारच्या झिनाईदंगा परिसरात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. राजू डे हे कूचबिहार ब्लॉक २ पंचायत समितीचे कर्माध्यक्ष आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. राजू डे यांच्यावर झालेल्या हल्ल्यापूर्वी आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हे हल्ले भाजपाने घडवून आणल्याचा आरोप केला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? आतापर्यंत तपासात काय समोर आले? भाजपावर काय आरोप करण्यात आले? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

  • रात्री ११ च्या सुमारास कूचबिहारच्या झिनाईदंगा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी तृणमूल काँग्रेसचे नेते राजू डे यांच्यावर गोळ्या झाडल्या.
  • या हल्ल्यात ते जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले, “गोळी त्यांच्या उजव्या खांद्यावर लागली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.”
  • गोळीबार करणारे आरोपी कारमधून आले होते; मात्र हल्ला केल्यानंतर ते आपले वाहन सोडून तेथून पळून गेले, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले.
  • तृणमूल काँग्रेसने या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपाने हा आरोप फेटाळून लावला आहे आणि तृणमूल काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला

गुरुवारी (३ जुलै) तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसमधील संतप्त कार्यकर्त्यांच्या गटाने केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालचे जनशिक्षण विस्तार व ग्रंथालय विभागाचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी हे पूर्व बर्दवान जिल्ह्यातील त्यांच्या विधानसभा मतदारसंघ मोंटेश्वरला भेट देण्यासाठी गेले होते. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेनंतर चौधरी यांनी संताप व्यक्त केला आणि हा हल्ला त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी केल्याचा आरोप केला.

मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना नाराज असलेले तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन आले आणि त्यांनी ‘चोर’ आणि ‘खंडणी उकळणारा’, अशा घोषणा दिल्या; तर काहींनी बूट आणि झाडू हलवले. तृणमूल काँग्रेसचे नेते व मोंटेश्वर ग्रामपंचायतीचे प्रमुख रफीकुल इस्लाम शेख म्हणाले की, स्थानिक रहिवाशांनी आपला राग व्यक्त केला. शेख म्हणाले, “चौधरी हे भ्रष्ट नेते आहेत. ते पैसे उकळतात. निवडणूक जिंकल्यानंतर ते कधीही मोंटेश्वरला गेले नाहीत. स्थानिक लोक त्यांच्यावर नाराज आहेत.” तर चौधरी यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देत म्हटले, “शेख हे खंडणी उकळणारे आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्यावर कारवाई करील.”

भाजपाचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करताना कोलकाता भाजपा नेते सजल घोष म्हणाले, “बंगालमधील लोक या राजवटीवर आणि त्यांच्या भ्रष्ट नेत्यांवर वैतागले आहेत. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना आणखी घडू शकतात.” या घटनेपूर्वी सीबीआयने २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुकोत्तर हिंसाचारात भाजपा नेते अविजित सरकार यांच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे आमदार परेश पॉल, नगरसेवक स्वपन समद्दर व पापिया घोष यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. सोमवारी सियालदाह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या आणखी एका आरोपपत्रात सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हेगारी कट रचणे (१२० ब), हत्या (३०२) व पुरावे गायब करणे (२०१), असे गुन्हे दाखल केले आहेत आणि खाली १५ जणांची नावेही दिली आहेत.

पोलिसांकडून पाच जणांना अटक

‘पीटीआय’ने वृत्त दिले, चौधरी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला माहिती दिली की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत आणि आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात त्यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्ल्यानंतर चौधरी म्हणाले होते, “माझ्या गाडीवर आणि माझ्या ताफ्यातील इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. हा मला मारण्याचा प्रयत्न होता. हा हल्ला तृणमूल काँग्रेस एका भ्रष्ट पंचायत नेत्याने आखला होता. स्थानिक पोलिसांनी सर्व काही पाहिले; पण कोणतीही कारवाई केली नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.” चौधरी हे जमियत उलेमा-ए-हिंदच्या पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष आहेत. त्यांनी २०२१ मध्ये पहिल्यांदाच टीएमसीसाठी मोंटेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सुमारे २६,००० मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी भाजपा नेत्याचा पराभव केला होता.