scorecardresearch

बारामती मतदारसंघात भाजपची अशीही मतपेरणी

ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी नाहीत, त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रलंबित विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे.

Baramati, Lok Sabha, election, BJP, fund, irrigation projects
बारामती मतदारसंघात भाजपची अशीही मतपेरणी

प्रथमेश गोडबोले

पुणे : लोकसभेच्या माढा आणि बारामती मतदारसंघांसह विधानसभेच्या दौंड, पुरंदर, हवेली, भोर, फलटण, माळशिरस अशा मतदारसंघांसाठी महत्त्वाचे असणारे निर्णय नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाला तब्बल ३९७६.८३ कोटी रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील भोर, साताऱ्यातील खंडाळा व फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या भागांना फायदा होणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता याच बैठकीत देण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारकडून सत्तेवर आल्यापासून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्लांना सुरुंग लावणाऱ्या निर्णयांची जंत्रीच उभी करण्यात येत आहे.

नीरा देवघर या प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खंडाळा तालुक्यातील ११ हजार ८६० हेक्टर आणि फलटण तालुक्यातील १३ हजार ५५०, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहा हजार ९७० अशा एकूण ४३ हजार ५० हेक्टर क्षेत्राला प्रवाही आणि उपसा सिंचनाने लाभ मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, बारामती तालुक्यातील ६४९८ असे एकूण २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

हेही वाचा… आप, वंचित, बसपाची मतांची मजल मर्यादितच

माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. सन २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. त्यामुळे माढा आणि शरद पवार यांचे जवळचे नाते आहे. मात्र, सध्या या मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. माढ्यात करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला हे सोलापुरातील चार, तर साताऱ्यातील फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असल्यानेच नीरा देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. फलटण (राष्ट्रवादी), पुरंदर-हवेली (काँग्रेस), भोर (काँग्रेस) आमदार आहेत. दौंड, माळशिरस या ठिकाणी भाजपचे आमदार असले, तरी या ठिकाणी राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे.

हेही वाचा… तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची उद्या राज्यात पहिली सभा, जोरदार वातावरणनिर्मिती

या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार, आमदारांना बळ देण्यासाठी आणि ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी नाहीत, त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रलंबित विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:44 IST