scorecardresearch

शिवसेनेच्या ‘ मराठी मुस्लिम ‘ ला तोंड देण्यासाठी भाजपचे व्यापारी व कष्टकरी मुस्लिम हे ‘ लक्ष्य ‘

मुंबईत २०-२५ लाखाहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असून महापालिका निवडणुकीचा विचार करता ७० प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

Shiv Sema, BJP, Muslim, Mumbai, Marathi Muslim , Traders and laborers Muslim
शिवसेनेच्या ' मराठी मुस्लिम ' ला तोंड देण्यासाठी भाजपचे व्यापारी व कष्टकरी मुस्लिम हे ' लक्ष्य ' ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

उमाकांत देशपांडे

मुंबई : आगामी महापालिका आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ‘ मराठी मुस्लिम ‘ संकल्पनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि मुस्लिम मते आपल्याकडे आकर्षित झाली नाहीत, तर किमान विरोधात जाऊ नयेत, यासाठी भाजपने आता व्यापारी व कष्टकरी मुस्लिमांवर ‘ लक्ष्य ‘ ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोहरा समाजाच्या शिक्षण संस्थेच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी मुंबईत येत असून कट्टरपंथी नसलेल्या मुस्लिम समुदायाबरोबर जवळीक व सौहार्द वाढविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) आणि नागरिकत्व कायद्यातील सुधारणांवरून भाजप आणि केंद्र सरकार विरोधात देशभरात वातावरण तयार झाले होते. हे वातावरण निवळावे आणि मुस्लिम व अन्य धर्मीयांशी सौहार्द वाढावा, यासाठी भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार व इतरांच्या माध्यमातून बोहरा समाज आणि अन्य मुस्लिम पंथीयांमधील मौलवी व मान्यवरांच्या शिष्टमंडळांनी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी व अन्य नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या एक-दीड वर्षात घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी हैदराबाद येथेही नुकतेच गरीब व कष्टकरी मुस्लिमांना विकासात बरोबर घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईसह राज्यात मुस्लिम सौहार्द वाढविण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातील गोंधळावरून शिंदे गटाच्या आमदारावर फुटले खापर

मुंबईत २०-२५ लाखाहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असून महापालिका निवडणुकीचा विचार करता ७० प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये एमआयएमने आपले उमेदवार उभे केले होते. मालवणी, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला व अन्य भागात हे प्रभाग आहेत व अन्य ठिकाणीही मुस्लिम मतदार विखुरलेले आहेत. भाजपचे गुजरातमध्ये बोहरी समाजाशी चांगले संबंध असून त्यातील बहुतांश लोक व्यापारी वर्गातील व शांतताप्रिय आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई सह कोकणातील मराठी मुस्लिमांना साद घालून आपल्याबरोबर वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने व्यापारी, सुधारणावादी आणि बेकरी, भंगार, टायर व अन्य व्यवसायातील कष्टकरी व गरीब मुस्लिमांकडे ‘ लक्ष्य ‘ पुरविण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा… विधिमंडळ नेता आणि प्रदेशाध्यक्षांच्या वादाची राज्यात परंपराच

पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यात बोहरी समाजाचे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या समवेत ‘ अरेबिक ‘ शिक्षण संस्थेचे उद्घाटन करणार आहेत. भेंडीबाजारातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) च्या माध्यमातून सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काही कामांची पायाभरणी केली. यावेळी ते सय्यदनां व अन्य मौलवींसमवेत बराच वेळ होते. मुस्लिम व ख्रिश्चन मतदार मुंबई व अन्यत्रही ठरवून भाजपविरोधात मतदान करतो. मुंबई महापालिका आणि पुढील निवडणुकीतही मुस्लिम मते ही महत्वाची आहेत. ती आपल्याला मिळाली नाहीत, तर किमान विरोधात जाऊ नयेत, यादृष्टीने भाजपने पायाभरणी सुरू केली आहे.

हेही वाचा… मुश्रीफ यांच्यावरील कारवाई आणि बँक अधिकाऱ्यांची कोंडी

‘ सबका साथ, सबका विकास ‘ हे उद्दिष्ट ठेवून देशाच्या विकासाच्या वाटचालीत भाजपने नेहमीच सर्वांना बरोबर घेतले आहे. विकासाचा विचार करताना जात, पात, धर्म व कुठलेही भेदाभेद केले जात नाहीत. भाजपकडून सर्वधर्मीयांशी सौहार्दाचे संबंध ठेवले जातात. त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणे चुकीचे आहे. — आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजप प्रभारी

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:31 IST
ताज्या बातम्या