कॉक्रोच जनता पार्टी व सरकारमध्ये वैर सुरू असतानाच एक नवीन अकाउंट एक्सवर उघडण्यात आले. हे नवीन अकाउंट उघडणाऱ्यांनी आपणच “खरे झुरळ” असल्याचा दावा केला आहे… तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने “ऑपरेशन एल” सुरू केले आहे. त्याअंतर्गत AIADMK च्या तीन आमदारांनी राजीनामे दिले… कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे… गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी केली… तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी पक्षाच्या २ आमदारांसह मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या बैठकीला उपस्थिती लावली. ममता बॅनर्जींवर टीका केली… जाणून घ्या देशातील ५ महत्त्वाच्या राजकीय घडामोडी.
AIADMK च्या तीन आमदारांचा राजीनामा, विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने “ऑपरेशन एल” सुरू केले आहे. तमिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी विजय यांच्या पक्षाला काँग्रेससह इतर लहान पक्षांचे समर्थन घ्यावे लागले होते. एकूण २३४ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी लागणारा ११८ जागांचा टप्पा गाठण्यासाठी विजय यांची दमछाक झाली होती. आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांच्या पक्षाने “ऑपरेशन एल” लाँच केल्याची चर्चा आहे. त्याअंतर्गत अण्णाद्रमुकच्या (एआयएडीएमके) तीन आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लगेचच त्यांनी विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. आगामी पोटनिवडणुकीत आमदारकीचा राजीनामा देणारे अण्णाद्रमुकचे नेते विजय यांच्या “शिट्टी” (whistle) या चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. पुढील आठवड्यात अण्णाद्रमुकचे (एआयएडीएम) सात ते आठ आमदार राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती एआयएडीएमके व टीव्हीके मधील सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून वाद; सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार दिल्लीत
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्लीत येण्याचे समन्स बजावले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे दोघांनाही दिल्लीचे बोलावणे आले आहे. नेतृत्व बदलाबाबत मंगळवारी (२६ मे) दोन्ही नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. मागील काही महिन्यांपासून सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील वादाने काँग्रेसची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात असलेला वाद काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सोडवायचा आहे. या दोघांमधील वादाने कर्नाटक काँग्रेसमध्ये सतत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, अशी माहिती काँग्रेस मधील सूत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, नेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांनी दोन्ही नेत्यांची स्वतंत्रपणे व एकत्रितपणे भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री पदाबाबत झालेल्या एका अलिखित कराराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात वाटून घेतला जाणार होता. परंतु, काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व या मुद्द्याला गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्सुक आहेत. परंतु, फेरबदल करण्याआधी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून डी.के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर दबाव टाकला आहे.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मागणीला समर्थन दिले आहे. गाय या प्राण्याला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेक मुस्लिम संघटना करत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहम्मद हमीद अन्सारी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी करण्यास पाठिंबा दिला. जर समस्येचे मूळ कारणच संपवता येणार असले तर ते केले पाहिजे, असे मोहम्मद हमीद अन्सारी म्हणाले. अन्सारी यांनी सोमवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले, “मी बातम्यांमध्ये वाचले की गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी काही स्तरांतून होत आहे. मला ही मागणी तर्कसंगत वाटली. कारण जर तुम्ही समस्येचे मूळ कारणच संपवू शकत असाल, तर ते नक्कीच केले पाहिजे.” मुस्लिम संघटनांच्या या मागणीला पाठिंबा देण्यामागचे कारण विचारले असता अन्सारी म्हणाले, “देशात आपापसात भांडण करण्यापेक्षा शांतता आणि सलोखा राखला गेलेला केव्हाही चांगला.” ईद-उल-अजहा (बकरीद) हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अन्सारी यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. जमीयत उलेमा-ए-हिंदचे (अर्शद मदनी गट) अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी गायीला “राष्ट्रीय प्राणी” घोषित करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला अनेक मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केल्यास गोहत्येच्या मुद्द्यावरून उद्भवणारा राजकीय वाद टाळता येईल, असे मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तिदार सुवेंदू अधिकारींच्या बैठकीत उपस्थित
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतील खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली. नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे झालेल्या या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे दोन आमदारही उपस्थित होते. “हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा एक प्रशासकीय कार्यक्रम आहे आणि प्रशासन सर्वांसाठी असते,” असे दस्तिदार यांनी बैठकीला जाण्यापूर्वी सांगितले. खासदार काकोली घोष दस्तिदार ह्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या सर्वात जुन्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या बारसात लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. काकोली यांना नुकतेच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) पदावरून हटवण्यात आले होते. २४ मे रोजी त्यांनी बारसातच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी ‘आय-पॅक’ (I-PAC) या राजकीय सल्लागार कंपनीची सेवा घेण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली. या कंपनीने पक्षात “गोंधळ” निर्माण केला आणि पक्षाचे “नुकसान” केले, असा आरोप काकोली घोष दस्तिदार यांनी केला आहे.
“आम्ही खरे कॉक्रोच”, युवक काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रमुखांचा दावा
कॉक्रोच जनता पार्टी व सरकारमध्ये वैर सुरू असतानाच एक नवीन अकाउंट एक्सवर उघडण्यात आले. हे नवीन अकाउंट उघडणाऱ्यांनी आपणच “खरे झुरळ” असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या युवक काँग्रेसकडून हे अकाउंट सुरू करण्यात आले. त्यावरून सरकारच्या विरोधातील गाणे व मिम्स पोस्ट केल्या जात आहेत. या अकाउंटचे नाव ‘इंडियन युथ कॉक्रोचेस’ असे आहे. याच नावाने वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. आपणच खरे “कॉक्रोचेस” असल्याचा दावा ‘इंडियन युथ कॉक्रोचेस’ने केला आहे. युवक काँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख मनू जैन म्हणाले, “आम्ही कोणाशी स्पर्धा करत नाही. तरूणांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणार खरे कॉक्रोच आम्ही आहोत. मग तो नीट पेपरफुटीचा विषय असो किंवा बेरोजगारीचा. कॉक्रोच जनता पार्टीकडून पोस्ट केले जाणारे बहुतांश एआय व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. आम्ही सध्या आघाडीवर आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून दररोज लढा देतोय आणि केसेस अंगावर घेतोय. त्यामुळे आम्ही स्वत:ला खरे कॉक्रोचेस म्हणवून घेतोय. आमची वेबसाइटही सरकारकडून ब्लॉक करण्यात आली होती, पण आम्ही आता youthcockroach.org या नावाने दुसरी वेबसाइट सुरू केली आहे. आमची वेबसाइट सुरू झाली असून आम्ही आता युवकांच्या संपर्कात आहोत.”
