पंतप्रधान नरेंद्र मोदी नीट पेपरफुटीच्या मुद्द्याकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्या (३० मे) दुपारी चार वाजता कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक होणार आहे. वंदे मातरम् हे संपूर्ण गीत न लावता त्यातील दोन कडवे विधानसभेत ऐकवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या सरकारवर टीकेची झोड उठली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष अभिजीत मुजुमदार यांनी राजीनामा दिला आहे. देशातील ५ महत्त्वाच्या राजकीय घडामोडी…

नीट पेपरफुटी प्रकरणात “पंतप्रधान वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून”, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

नीट पेपरफुटीप्रकरणी गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्याकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. “पंतप्रधान या मुद्द्याकडे वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत”, तसेच या विषयाकडे केंद्र सरकारने सर्वोच्च पातळीवर लक्ष दिले आहे, असे मेहता म्हणाले. न्यायाधीश जे. नरसिम्हा यांनी नीट परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. परीक्षेसाठी सध्या असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एक उच्चाधिकार समिती नीट परीक्षेचे व्यवस्थापन करत असतानाही असे प्रकार का घडतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समितीने केलेल्या शिफारसींमध्ये काही त्रुटी असतील किंवा त्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. नीट पेपरफुटल्याने एनटीएने नीट पेपर रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ अकाऊंट सुरू करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात यावे यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ अकाऊंट तात्काळ सुरू करण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ अकाऊंट बंद का करण्यात आले, या प्रकरणी केंद्र सरकार व ‘एक्स’ने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे. गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव” कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट बंद करण्यात यावे असा अहवाला केंद्र सरकारला प्राप्त झाला होता, त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली होती.

कर्नाटकचा मुख्यमंत्री उद्या ठरणार?

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काल (२८ मे) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही आज राहुल गांधींची भेट घेतली आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय द्वंद्व सुरू होते. उद्या (३० मे) दुपारी चार वाजता काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार असतील, यावर शिक्कामोर्तब होईल.

केरळमध्ये वंदे मातरम् वरून वाद

केरळमध्ये नव्याने स्थापन झालेले काँग्रेस सरकार वंदे मातरम् वरून वादात सापडले. विधानसभेच्या पहिल्याच सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणाआधी झालेल्या वंदे मातरम् गीतावरून वाद उफाळला. वंदे मातरम् हे संपूर्ण गीत न लावता त्यातील दोन कडवे विधानसभेत ऐकवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या सरकारवर टीकेची झोड उठली. आज केरळमध्ये विधानसभेत आमदारांच्या शपथविधीच्या आधीच वाद झाला. सतीशन हे संघ परिवाराला शरणागत झाले आहेत, अशी टीका लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटकडून (एलडीएफ) करण्यात आली. वंदे मातरम् सुरू असताना उभे राहण्याचीही सक्ती नाही, असे माकपचे नेते व विरोधी पक्षनेते पिनराई विजयन म्हणाले. तर भाजपा आमदार व्ही. मुरलीधरन यांनी काँग्रेस सरकारने राज्यपालांचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली. राज्यपाल उपस्थित असलेल्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन करणे आवश्यक असते, असे ते म्हणाले.

“पक्ष फक्त मुस्लिमांसाठी काम करतो”, आसाममधील टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

तृणमूल काँग्रेस पक्षाचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष अभिजीत मुजुमदार यांनी शुक्रवारी (२९ मे) राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष आसाम व पश्चिम बंगालमध्ये फक्त मुस्लिमांसाठी काम करतो, असा आरोप त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मुजुमदार यांनी ईमेलद्वारे ममता बॅनर्जी यांना राजीनामा पाठवला आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, आसाममध्ये पक्ष फक्त मुस्लिमांसाठी काम करतो अशी पक्षाची छबी झाली आहे. पक्षाचे असेच चित्र पश्चिम बंगालमध्येही दिसून आले, असा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या १०० हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तसेच आमदार – खासदारही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.