scorecardresearch

नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

नागपूरच्या जागेवर गडकरी-फडणवीस- बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने शेवटच्या टप्प्यात फडणवीस चमत्कार घडवतील, असा विश्वास शिक्षक परिषदेला आहे.

Nagpur teachers constituency BJP
नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान (लोकसत्ता ग्राफिक्स)

पक्षांतर्गत धुसफूस, उमेदवाराविषयी असलेली नाराजी आणि जुनी पेन्शन योजनेविरोधात असल्याचा मुद्दा यावरून भाजपाने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्यापुढे ही जागा राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, असे असले तरी नागपूरच्या जागेवर गडकरी-फडणवीस- बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने शेवटच्या टप्प्यात फडणवीस चमत्कार घडवतील, असा विश्वास शिक्षक परिषदेला आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार, महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, बहुजन समाज पक्षाच्या निमा रंगारी, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रा. दीपक खोब्रागडे यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत गाणार, अडबाले व झाडे यांच्यारुपात विदर्भ शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक भारती या तीन प्रमुख शिक्षक संघटनांमध्ये आहे.

एकूण ३९०६०४ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार नागपूर (१६४८०) मध्ये असून दुसरा क्रमांक चंद्रपूर (७५७१) जिल्ह्याचा आहे. या दोनच जिल्ह्यांतील मतांवर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गाणार यांची व्यक्तिगत प्रतिमा चांगली असली तरी त्यांच्या कार्यशैलीवर त्यांच्या संघटनेत व भाजपामध्ये एक गट नाराज आहे. यंदा नवा चेहरा द्यावा, अशी मागणी दोन्ही पातळीवरून झाली. मात्र, गाणार ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होऊन पुन्हा रिंगणात उतरले. असे असले तरी वरील दोन्ही पातळीवरील नाराजी कायम आहे. शिवाय जुनी पेन्शन योजना हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा आहे.

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी तीन शाळकरी मुले पोहायला गेले अन…

फडणवीस यांनी विधिमंडळात त्याला विरोध केला होता आता त्यांनी भूमिका बदलली असली तरी त्याचा फटका गाणार यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शनला विरोध करणाऱ्या भाजपाचा पाठिंबा घेतला, अशी भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. असे असले तरी गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे ही तीन नेते नागपूरचे असल्याने ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच भाजपाने संघटनात्मक पाठबळ गाणार यांच्यापाठीशी उभे केले आहे. या निवडणुकीतील जय-पराजयाचे चांगले-वाईट पडसाद राज्य व राष्ट्रीय राजकारणात उमटतात. त्यामुळे भाजपा कुठलाही धोका पत्करण्याच्या स्थितीत सध्या नाही. सध्या प्रतिकूल स्थिती असली तरी शेवटच्या टप्प्यात फडणवीस चमत्कार करतील, अशी अपेक्षा भाजपा व शिक्षक परिषदेला आहे. उमेदवार महत्वाचा नाही पक्ष, असे आदेश भाजपा नेत्यांना देण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले हे मागील दोन वर्षांपासून निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारसंघ हा एकेकाळी माध्यमिक शिक्षक संघाचा बालेकिल्ला राहिला आहे. अडबाले यांना १८ शिक्षक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व गट त्यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जुनी पेन्शन योजना हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. माध्यमिक शिक्षक संघटना ही काँग्रेसची जुनी समर्थक संघटना आहे. काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांचा त्यांना फायदा होऊ शकतो. महाविकास आघाडीने घोळ घालत अखेर त्यांना पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसमधील धूसफूस ही अडबाले यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अद्याप त्यांच्यासाठी प्रचाराला आले नाही हे येथे उल्लेखनीय. काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी झाडे यांना पाठिंबा जाहीर करून एक वाक्यता नसल्याचे दाखवून दिले.

हेही वाचा – “आंबेडकर-ठाकरे युतीचा ‘मविआ’शी काहीही संबंध नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्यपालांतर्फे शिंदे-फडणवीस यांना..”

शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. पराभवाने खचून न जाता त्यांनी शिक्षकाच्या मतदार नोंदणीकडे लक्ष देऊन आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. आमदार कपील पाटील त्यांच्या प्रचारासाठी येऊन गेले. त्यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. काँग्रेसमधील एक गट त्यासाठी प्रयत्नशीलही होता. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने अडबाले यांना पाठिंबा दिला. मात्र, काँग्रेसचा एक गट सोबत असल्याचा दावा झाडे समर्थक करतात.

आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन विकास आघाडी प्रथमच या निवडणूक रिंगणात उतरली आहे. या तीन पक्षांकडे जाणारी मते भाजपविरोधी असणार आहे, त्यामुळे त्याचा फायदा गाणार यांनाच होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार नागोराव गाणार यांचा या मतदारसंघात निसटता विजय झाला होता. त्यासाठी शिक्षक भारती व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या उमेदवारांमध्ये झालेली मतविभागणी कारणीभूत ठरली होती. यावेळी कमी अधिक प्रमाणात तेच चित्र आहे. अशा स्थितीत दलित मते निर्णायक ठरतील. त्यांचा कल कोणाकडे जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

जिल्हानिहाय मतदार

नागपूर – १६,४८०
वर्धा – ४८९४
भंडारा – ३७९७
गोंदिया – ३८८१
चंद्रपूर – ७५७१
गडचिरोली – ३२११
एकूण – ३९६९४

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:27 IST